अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:38 IST2025-10-15T08:36:56+5:302025-10-15T08:38:47+5:30
कपड्याच्या फॅक्ट्रीमध्ये आणि जवळच्या केमिकल वेअरहाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीत १६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

फोटो - आजतक
बांगलादेशची राजधानी ढाका येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. कपड्याच्या फॅक्ट्रीमध्ये आणि जवळच्या केमिकल वेअरहाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीत १६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण अधिकारी तल्हा बिन जसीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग केमिकल वेअरहाऊसमध्ये लागली आणि इतर फॅक्ट्रीमध्ये पसरली. सर्वात आधी आग शाह आलम केमिकल वेअरहाऊसला लागली आणि नंतर एनार फॅशन गारमेंट्स फॅक्ट्रीपर्यंत पसरत गेली.
अग्निशमन सेवा प्रवक्ते अन्वरुल इस्लाम म्हणाले री, "शोध मोहिमेदरम्यान कपड्याच्या फॅक्ट्रीमध्ये १६ मृतदेह सापडले. आग विझवण्यात आली आहे, परंतु केमिकल वेअरहाऊसमधील आग अजूनही धुमसत आहे."
अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण संचालक लेफ्टनंट कर्नल मोहम्मद ताजुल इस्लाम चौधरी यांनी सांगितलं की, मृतदेहांची स्थिती इतकी भयानक आहे की त्यांची ओळख डीएनए चाचणीद्वारेच पटवावी लागेल. मृतदेह ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
लोक दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अडकले होते. इमारतीचे छत टिन आणि गवताचे बनलेलं होतं. विषारी वायू आणि फ्लॅशओव्हरमुळे लोक बेशुद्ध झाले आणि मृत्युमुखी पडले. चौधरी यांनी स्पष्ट केलं की, केमिकल वेअरहाऊसमध्ये सहा ते सात प्रकारचे केमिकल्स साठवली गेली होती. बचाव कार्यासाठी ड्रोन आणि लूप मॉनिटर्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.