चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:53 IST2025-11-05T14:52:39+5:302025-11-05T14:53:59+5:30
आरोग्य विभागाच्या मते, अवघ्या २४ तासांत १,१०१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७३,९२३ झाली आहे.

चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
बांगलादेशमध्येडेंग्यू व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोग्य विभागाने (DGHS) आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, ज्यामुळे मृतांची एकूण संख्या २९२ झाली. राजधानी ढाकामध्ये परिस्थिती सर्वात गंभीर आहे, जिथे रुग्णालये लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहेत आणि अनेक भागात बेडची मोठी कमतरता आहे. आरोग्य विभागाच्या मते, अवघ्या २४ तासांत १,१०१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७३,९२३ झाली आहे.
ढाकाच्या दोन्ही शहर महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. DGHS च्या ताज्या आकडेवारीनुसार, ढाकाच्या उत्तर भागात २४१, दक्षिणेत १७५ आणि बरीशाल, चट्टोग्राम, खुलना आणि राजशाही सारख्या इतर विभागांमध्ये शेकडो रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातही संसर्ग पसरू लागला आहे, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर आणखी ताण आला आहे.
सातत्याने वाढतोय डेंग्यूचा धोका
गेल्या तीन वर्षातील आकडेवारीवरून असं दिसून येतं की, बांगलादेशात डेंग्यूचा धोका सातत्याने वाढत आहे. २०२३ मध्ये, या आजाराने १,७०५ जणांचा जीव घेतला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. २०२४ मध्ये मृत्यू ५७५ पर्यंत कमी झाले, परंतु २०२५ मध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ही फक्त नोव्हेंबरची सुरुवात आहे आणि मृतांची संख्या आधीच २९२ वर पोहोचली आहे.
भारताच्या पूर्वेकडील राज्यांसाठी धोक्याची घंटा
आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की बांगलादेशमध्ये डेंग्यूच्या वेगाने वाढणाऱ्या घटनांचा पूर्व भारतावर परिणाम होऊ शकतो. पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि झारखंड सारखी राज्ये संसर्गाला बळी पडू शकतात, कारण भारत-बांगलादेश सीमा आहे आणि लोक सतत येत असतात. पाऊस आणि आर्द्रतेमुळे या राज्यांमध्ये डासांची पैदास होण्याची शक्यता देखील वाढते.
बांगलादेश सरकारच्या कडक उपाययोजना
डेंग्यूमुळे परिस्थिती बिकट होत असताना, डीजीएचएसने सर्व सरकारी रुग्णालयांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र डेंग्यू वॉर्ड तयार करणं बंधनकारक आहे आणि विशेष वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत. सरकारने प्रत्येक जिल्ह्यात डास प्रतिबंधक फवारणी, अळ्या नियंत्रण आणि स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. डासांची संख्या कमी करण्यासाठी ढाकामध्ये सतत फॉगिंग आणि स्वच्छता केली जात आहे, परंतु सततचा पाऊस आणि पाणी साचल्याने डासांची पैदास रोखली जात नाही.