पाकिस्तानी सैनिकावर गोळ्यांचा वर्षाव; BLA कडून महिला 'फिदायीन'चा वापर, ५० हून अधिक जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 09:34 IST2026-02-03T09:31:29+5:302026-02-03T09:34:30+5:30
बीएलएच्या महिला फिदायीनकडून पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला होता.

पाकिस्तानी सैनिकावर गोळ्यांचा वर्षाव; BLA कडून महिला 'फिदायीन'चा वापर, ५० हून अधिक जण ठार
Baloch Woman Fidayeen:पाकिस्तानचा सर्वात अशांत प्रांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमध्ये भीषण आत्मघाती हल्ले केले आहेत. या हल्ल्याचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे बीएलएने पहिल्यांदाच महिला फिदायीन मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरवल्या आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये १७ सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर सध्या एका महिला दहशतवाद्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला हातात मोठी बंदूक घेऊन पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या इमारतीजवळ अत्यंत सावधपणे वावरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हल्ल्याच्या काही मिनिटे आधी ही महिला आपल्या पुरुष सहकाऱ्यांसोबत हसताना आणि विनोद करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानी सरकारची थट्टा उडवत म्हणते, "पाकिस्तान भीतीपोटी समोर येत नाहीये. आज तुम्हाला बलोच महिला स्वातंत्र्यसैनिकांचा सामना करावा लागेल. बलोच महिलांशी लढणे किती कठीण आहे हे आज तुम्हाला समजेल."
"आता तडजोड नाही"; आत्मघाती हल्लेखोराचा मेसेज
गोळीबाराचा आवाज ऐकू येत असतानाच ती महिला एका कोपऱ्याच्या दिशेने जाताना दिसते आणि अचानक गोळीबार सुरू करते. मृत्यूच्या काही क्षण आधी तिने दिलेला संदेश पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. ती म्हणते, "बलोच राष्ट्राने आता जागे झाले पाहिजे. शत्रूचे कमी दिवस उरलेत. त्यांच्याकडे फार ताकद उरलेली नाही. या शत्रूसोबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, हे बलोच जनतेने समजून घ्यावे."
४० तास चालले भीषण युद्ध
शुक्रवारपासून सुरू झालेला हा हिंसाचार शनिवारीही सुरूच होता. बीएलएने बलोचिस्तानमधील विविध शहरे आणि गावांमध्ये एकत्रित हल्ले केले. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ४० तास मोठी मोहीम राबवली. बलुचिस्तानचे मंत्री सरफराज बुगटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत आतापर्यंत १४० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
अमेरिकेने बीएलएला आधीच जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. या संघटनेने बलोचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्र हाती घेतले असून, पाकिस्तान सरकार आणि चिनी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना ते सातत्याने लक्ष्य करत आहेत. मात्र, यावेळी महिलांचा आत्मघाती हल्ल्यासाठी केलेला वापर ही चिंतेची मोठी बाब मानली जात आहे.