२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:19 IST2026-01-10T13:19:03+5:302026-01-10T13:19:37+5:30
Astronaut Sick News: ७ जानेवारी रोजी जेव्हा नासाने अंतराळात होणारी 'स्पेसवॉक' थांबवली, तेव्हाच काहीतरी अघटित घडल्याची चर्चा सुरू झाली होती.

२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार
वॉशिंग्टन: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेल्या २५ वर्षांत जे घडले नाही, ते आता घडणार आहे. एका अंतराळवीराची प्रकृती बिघडल्याने 'नासा'ने संपूर्ण 'क्रू-११' टीमला नियोजित वेळेपूर्वीच तातडीने पृथ्वीवर परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अंतराळात उपचारांच्या मर्यादित सुविधा पाहता नासाने हा मोठा धोका पत्करण्यास नकार दिला आहे.
७ जानेवारी रोजी जेव्हा नासाने अंतराळात होणारी 'स्पेसवॉक' थांबवली, तेव्हाच काहीतरी अघटित घडल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर ८ जानेवारीला नासाने अधिकृतपणे जाहीर केले की, क्रू-११ च्या सदस्यांना काही दिवसांतच परत आणले जाईल. जरी आजारी अंतराळवीराची प्रकृती सध्या स्थिर असली, तरी अंतराळातील प्रतिकूल वातावरण पाहता त्यांना तिथे ठेवणे सुरक्षित नाही, असे नासाचे मत आहे.
२५ वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळ
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक तांत्रिक बिघाड झाले आहेत, पण केवळ एका सदस्याच्या आजारपणामुळे संपूर्ण मोहिमेचे सर्व सदस्य परत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. नासाने स्पष्ट केले आहे की, कोणतीही दुर्घटना किंवा दुखापत झालेली नाही, तर हे केवळ आरोग्याशी संबंधित प्रकरण आहे.
कोण आहेत हे अंतराळवीर?
माइक फिंके (अमेरिका), जेना कार्डमॅन (अमेरिका), किमिया युई (जपान), ओलेग प्लाटोनोव (रशिया) हे अंतराळवीर ऑगस्ट २०२५ पासून अंतराळात गेलेले आहेत. ते आता परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.
नासाचे सावध पाऊल
आजारी अंतराळवीराला नेमका कोणता आजार झाला आहे, हे नासाने अद्याप गोपनीय ठेवले आहे. मात्र, "कोणतीही आणीबाणी नाही, तरीही सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे," असे नासाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.