"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:24 IST2025-10-01T09:23:14+5:302025-10-01T09:24:41+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या भेटीबद्दल एक विधान केले आहे.

"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
Donald Trump Asim Munir: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी थांबवल्याचा दावा केला. माझ्या हस्तक्षेपामुळे मोठा संघर्ष टळला, असे सांगताना त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी केलेल्या कौतुकाचाही उल्लेख केला. असीम मुनीर मला म्हणाले की, 'तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले', असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "पाकिस्तानचे पंतप्रधान लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासह आले आहेत. जे की पाकिस्तानमध्ये खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत. आणि त्यांनी एका शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले की, 'जे युद्ध सुरू होते, ते थांबवून या माणसाने कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले आहेत."
...तर युद्ध खूप विकोपाला गेले असते
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "ते (भारत-पाकिस्तान) युद्ध खूप विकोपाला गेले असते. माझा सन्मान केला गेला. ते त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले, ते मला खूप आवडले. सुसी विल्स (व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ) तिथे होती. तिने सांगितले की, ती सर्वात सुंदर गोष्ट होती. पण आम्ही त्यापैकी बऱ्याच लोकांचे जीव वाचवले आहेत."
डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचे दावे करत आहेत. व्यापार रोखण्याची धमकी देत भारत आणि पाकिस्तानला युद्ध थांबवायला लावलं, असे ट्रम्प म्हणत आहेत.
ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सात युद्धे, संघर्ष थांबवल्याचे दावे अनेकदा करण्यात आले आहेत. यात भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाचाही उल्लेख केला जात आहे. भारताकडून मात्र, ट्रम्प आणि व्हाईट हाऊसकडून करण्यात येणारे दावे फेटाळून लावण्यात आलेले आहेत.