अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 08:05 IST2025-11-26T08:05:27+5:302025-11-26T08:05:42+5:30
भारत व चीन यांच्या संबंधात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने दोन्ही देशांत पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे

अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
बीजिंग : अरुणाचल प्रदेशातीलभारतीय महिलेचा शांघाय विमानतळावर छळ केल्याच्या आरोपांचे चीनने मंगळवारी खंडन केले. अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश आहे, असा दावा चीनने मंगळवारी केला. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या व अरुणाचल प्रदेशमधील मूळ रहिवासी असलेल्या पेमा वांगजॉम थोंगडॉक यांच्याकडे चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी केलेली विचारणा ही आमचे कायदे व नियमांनुसार योग्यच होती, अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे.
भारत व चीन यांच्या संबंधात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने दोन्ही देशांत पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पेमा वांगजॉम थोंगडॉक या २१ नोव्हेंबरला लंडनहून जपानला जाताना प्रवासातील तीन तासांचा ले-ओव्हर त्यांच्यासाठी एक त्रासदायक अनुभव ठरला. चीनच्या इमिग्रेशन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट अवैध ठरविला. त्यांचे जन्मस्थान अरुणाचल प्रदेश असल्यामुळे चीनने कारवाई केली. थोंगडॉकला झालेल्या या त्रासाबद्दल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, थोंगडॉकवर कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही, त्यांना ताब्यात घेतले नव्हते तसेच छळही करण्यात आलेला नाही.
अवैधरीत्या स्थापना केल्याचा आरोप
पेमा वांगजॉम थोंगडॉक यांना मिळालेल्या वागणुकीचा भारताने चीनकडे तीव्र निषेध नोंदविला होता. तसेच अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे ठामपणे सांगितले होते. मात्र, चीनने त्यावर दर्पोक्ती केली की अरुणाचल प्रदेश हा मुळात चीनचा झांगनान प्रदेश आहे. तिथे भारताने अवैधरीत्या अरुणाचल प्रदेश राज्याची स्थापना केली, असा आरोप चीनने केला आहे.