लेख: इमरान खान यांच्या बहिणींशी गैरवर्तन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 10:55 IST2025-11-22T10:54:34+5:302025-11-22T10:55:46+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर पाकिस्तानात शंभरापेक्षा जास्त केसेस सुरू आहेत आणि ऑगस्ट २०२३ पासून ते जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लेख: इमरान खान यांच्या बहिणींशी गैरवर्तन!
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर पाकिस्तानात शंभरापेक्षा जास्त केसेस सुरू आहेत आणि ऑगस्ट २०२३ पासून ते जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी गिफ्ट (तोशाखाना केस) विकण्याचे आणि सरकारी गुप्त माहिती लीक करण्यासारखे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. आपली पत्नी बुशरा बिबीचा आणि आपला पाकिस्तान सरकार मुद्दाम छळ करत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला आहे. आता इमरान खान यांच्या बहिणींनाही मारहाण आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचं समोर आले आहे.
ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा इमरान यांच्या बहिणी इमरान खान यांना भेटायला अडियाला जेलमध्ये गेल्या होत्या; पण त्यांना भेटू दिले नाही. इमरान खान यांच्या बहिणींचं म्हणणं आहे, इमरान खान यांना त्यांच्या परिवाराला भेटण्याचा अधिकार न्यायालयानं दिला आहे, पण सरकार त्यात कायम अडथळा आणतं आणि त्यांना भेटू दिलं जात नाही. त्यांच्यावर कायम अन्याय आणि दडपशाही केली जाते. इमरान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षानं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये इमरान खान यांच्या बहिणी अलिमा, नोरीन आणि उज्मा जेलच्या बाहेर बसलेल्या दिसतात. अलिमा आणि उज्मा नोरीनला सांभाळताना दिसतात, ज्या फारच घाबरलेल्या दिसतात.
अलिमा सांगतात, आम्ही शांतपणे जेलबाहेर बसलेलो होतो, पण पोलिसांनी आम्हाला रस्त्यावर ओढत नेलं. दुसऱ्या व्हिडरओमध्ये नोरीन सांगतात, काहीही कारण नसताना महिला पोलिसांनी त्यांचे केस पकडून त्यांना खाली पाडलं. मारहाण केली. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना, न्यायालयाच्या निर्देशांनुसार इमरान यांची फक्त भेट मागत असतानाही कायम असा प्रकार का होतो ते कळत नाही. आम्हाला भावाला तर भेटू दिलं नाहीच, पण पोलिसांनी गैरवर्तन करत जबरदस्तीनं आम्हाला ताब्यात घेतलं.
पीटीआय पक्षानं आरोप केलाय की फक्त खान यांच्या बहिणींनाच नव्हे, तर खैबर प्रांताच्या मंत्री मीना खान अफरीदी, खासदार शाहिद खट्टक आणि इतर अनेक महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी मारहाण केली. इमरान खान यांच्या बहिणींशी गैरवर्तन करण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी सप्टेंबर २०२५मध्ये अडियाला जेलच्या बाहेर माध्यमांशी बोलताना अलिमावर अंडी फेकण्यात आली होती. एप्रिल २०२५मध्ये अलिमा, नोरीन आणि उज्मा यांना जेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली होती.
अलिमा खान या इमरान खान यांच्या चॅरिटेबल संस्थांशी जोडल्या आहेत. डॉ. उज्मा खान या प्रख्यात सर्जन आहेत. नोरीन नियाजी यांच्याबद्दल मात्र सार्वजनिक क्षेत्रात फार कमी माहिती उपलब्ध आहे. अल-कादिर ट्रस्टच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारची अब्जावधी रुपयांची जमीन अत्यंत कमी किमतीत विकल्याचाही आरोप इमरान खान यांच्यावर आहे. या प्रकरणात ९ मे २००३ रोजी इमरान खान यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानभर सैन्याच्या अनेक ठिकाणांवर हल्ले झाले होते. इमरान खान यांचं म्हणणं आहे, सगळ्याच खोट्या केसेसमध्ये मला अडकवण्यात आलेलं आहे आणि माझ्या कुटुंबीयांनाही कायम त्रास दिला जात आहे.