अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 10:41 IST2025-08-21T10:39:50+5:302025-08-21T10:41:38+5:30
अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने भारतात मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या “टॉप १०० मोस्ट वॉन्टेड फ्यूगिटिव्हज” यादीतील एका महिला आरोपीला त्यांनी पकडले आहे.

अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने भारतात मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या “टॉप १०० मोस्ट वॉन्टेड फ्यूगिटिव्हज” यादीतील एका महिला आरोपीला त्यांनी पकडले आहे. सिंडी रॉड्रिगेज सिंग असे या महिलेचे नाव असून, तिच्यावर तिच्या ६ वर्षांच्या मुलाची, रॉड्रिगेज अल्वारेजची हत्या केल्याचा आरोप आहे.
टेक्सास पोलिसांनी तिच्याविरुद्ध १० वर्षांखालील मुलाच्या हत्येसाठी कॅपिटल मर्डर वॉरंट जारी केले होते. याशिवाय, ती शिक्षा होऊन देखील पोलिसांपासून लपून पळून गेल्याचा आरोपही तिच्यावर होता.
इंटरपोलच्या नोटीसनंतर कारवाई
३ ऑक्टोबर २०२४ रोजी इंटरपोलने सिंडी रॉड्रिगेज सिंगविरुद्ध रेड नोटीस जारी केली होती. त्यानंतर लगेचच अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी तिच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक कागदपत्रे भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. भारत आणि अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी एकत्रितपणे तिला अटक केली. एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी या अटकेबद्दल बोलताना सांगितले की, "गुन्हेगार कितीही लांब पळून गेला तरी तोकायद्यापासून वाचू शकत नाही, हे या अटकेने सिद्ध झाले आहे."
"अशा गुन्हेगारांचा पाठलाग आम्ही कधीही सोडणार नाही," असे पटेल यांनी सांगितले. टेक्सास पोलीस, डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि भारतीय अधिकाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे सांगत त्यांनी त्यांचे एक्सवर आभार मानले.
BREAKING: @FBI has arrested another Top 10 Most Wanted Fugitive: Cindy Rodriguez Singh.
— FBI Director Kash Patel (@FBIDirectorKash) August 20, 2025
Singh is wanted on state charges of killing her six-year-old son. She will face charges of Unlawful Flight to Avoid Prosecution and Capital Murder of a person under 10 years of age.
In March… pic.twitter.com/0GWaNxRaMA
प्रकरणाची सुरुवात कशी झाली?
हे प्रकरण २० मार्च २०२३ रोजी सुरू झाले. टेक्सासच्या एव्हर्मन पोलीस डिपार्टमेंटने मुलाच्या सुरक्षिततेची चौकशी करण्यासाठी त्याच्या घरी भेट दिली. तेव्हा पोलिसांना कळले की, मुलाला ऑक्टोबर 2022 पासून कोणीही पाहिले नव्हते. त्याला फुफ्फुसांचे आजार, हाडांची कमजोरी आणि इतर गंभीर आरोग्य समस्या होत्या.
पोलिसांनुसार, सिंगने अधिकाऱ्यांना सांगितले की तिचा मुलगा मेक्सिकोमध्ये त्याच्या वडिलांसोबत राहत आहे. पण तपासात ही माहिती खोटी असल्याचे समोर आले. २२ मार्च २०२३ रोजी सिंडी रॉड्रिगेज सिंग तिचा पती आणि इतर ६ मुलांसोबत भारतात पळून गेली. पण तिचा मुलगा त्यांच्यासोबत नव्हता. जुलै २०२३ मध्ये एफबीआयने तिला त्यांच्या “मोस्ट वॉन्टेड” यादीत टाकले होते आणि आता अखेरीस तिला भारतात अटक करण्यात यश आले आहे.