Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:45 IST2025-06-16T14:41:36+5:302025-06-16T14:45:48+5:30

Donald Trump Warns Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला.

American president Donald Trump Warns Iran | Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!

Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!

वॉशिंग्टन:इराणवरइस्रायलने केलेल्या हल्ल्यांशी अमेरिकेचा काही संबंध नाही. आमच्या वाटे जाऊ नका. या संघर्षात इराणने अमेरिकी ठिकाणांवर कोणत्याही प्रकारे हल्ले केले, तर अमेरिकी फौजा अक्षरश: तुटून पडतील. मग असे हाल करू की, यापूर्वी कधीच इराणचे कधीच झाले नसतील, अशा शब्दांत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याचा प्रस्तावही दिला आहे. हा रक्तरंजीत संघर्ष थांबवण्यासाठी इस्रायल-इराण यांच्यात सहज युद्धबंदी करार घडवून आणू, असे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी  इराणने इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवले असून, यात मोठे नुकसान झाले आहे.

इस्रायल-इराण संघर्षावर तोडगा काढण्यासाठी करार घडवून आणण्याचा प्रस्ताव देताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचे श्रेय घेतले आहे. या दोन देशांना जसे थांबायला सांगितले, तसेच इस्रायल-इराणच्या दोन प्रमुख नेत्यांत चर्चा घडवून आणू आणि शांततेचा मार्ग काढू, असे ट्रम्प यांनी म्हटले.

भारतीयांना सुरक्षित आणा: काँग्रेस
इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकारने व्यवस्था करावी, अशी मागणी जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली आहे.

इस्रायल भयंकर हल्ले करण्याची शक्यता
इराणमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांनी तेथील शस्त्रास्त्र कारखान्यांतून तत्काळ बाहेर पडावे, असा इशारा इस्रायलने पारशी भाषेत दिला आहे. या इशाऱ्यामुळे इस्रायल आता या लक्ष्यांवर भयंकर हल्ले करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...तर प्रत्युत्तरादाखल हल्ले थांबवू
इस्रायलने सुरू केलेले हल्ले थांबवले, तर इराणही प्रत्युत्तरादाखल हल्ले थांबवेल, असे या देशाचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. रविवारी तेहरानमध्ये अराघची यांनी हा प्रस्ताव दिला. शुक्रवारी इस्रायलने हल्ले सुरू केल्यानंतर प्रथमच ते समोर आले आहेत. इस्रायलने त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

इस्रायली गुप्तहेर खोलवर घुसले
इस्रायलचे गुप्तहेर इराणमध्ये खोलवर घुसले असून, यामुळेच लष्कराचे अधिकारी आणि शास्त्रज्ञांना इस्रायलने सहज लक्ष्य केले. या गुप्तहेरांना शोधणे इराणला अजून शक्य झालेले नाही.

Web Title: American president Donald Trump Warns Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.