VIDEO: १५९ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाने घेतला पेट; इमर्जन्सी लँडिंगमुळे वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:19 IST2025-06-26T18:16:23+5:302025-06-26T18:19:34+5:30
इंजिनमध्ये आग लागल्यानंतर अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचे येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

VIDEO: १५९ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाने घेतला पेट; इमर्जन्सी लँडिंगमुळे वाचला जीव
American Airlines Plane: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच आणखी एका विमानाचा अपघात होता होता वाचला. अमेरिकेत लास वेगास येथे बुधवारी सकाळी अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचे येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या इंजिनला आग लागल्यामुळे विमान परत बोलवण्यात आलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसत आहे.
टेकऑफ दरम्यान विमानाच्या इंजिनला आग लागल्याने अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. इंजिनमध्ये आगीचे लोळ पाहून पायलटने एटीसीशी संपर्क साधला आणि विमानाचे विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. टेकऑफ केल्यानंतर १० मिनिटांतच विमान परतले, इंजिनमध्ये आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होते. आपत्कालीन लँडिंगनंतर विमानाच्या आपत्कालीन गेटमधून त्यांना बाहेर काढण्यात आल्यानंतर ते खूप घाबरले होते. सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी, अनेक प्रवाशांना डॉक्टरांकडून समुपदेशन घ्यावं लागल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने दिलगिरी व्यक्त केली आहे.
#BreakingNews :-
— HASSAN🔻𝕏 (@HassanSiddiqei) June 26, 2025
American Airlines Flight 1665 had to return to Las Vegas after its engine caught fire. This flight was going from Las Vegas in USA to North Carolina but it had to return within 10 minutes. There were 153 passengers on board this plane. It is being told that the… pic.twitter.com/EU9IQFdX4q
अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट १६६५ ने लास वेगासमधील हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. सकाळी ८:१० वाजता उड्डाण करणारे हे विमान उत्तर कॅरोलिनातील शार्लोट येथे उतरणार होते. हे विमान एअरबस ए३२१ होते जे उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग लागल्यामुळे १० मिनिटांत विमानतळावर परतले. इंजिनमधून येणारा धूर लोकांनीही पाहिला आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. विमानतळ कर्मचाऱ्यांनी एटीसीद्वारे फ्लाइट पायलटला इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती दिली. पायलटने क्रू मेंबर्स आणि प्रवाशांना सतर्क केले. आपत्कालीन लँडिंगसाठी तातडीने एटीसीशी संपर्क साधला.
परवानगी मिळताच वैमानिकाने विमान सुरक्षितपणे उतरवले. या विमानात १५३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन आणि अमेरिकन एअरलाइन्सने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. "विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवले जाईल. ज्यांना परतफेड हवी आहे ते एअरलाइन अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. क्रू मेंबर्सनी कठीण काळातही समयसूचकता दाखवली, याबद्दल आम्ही टीमचे आभारी आहोत. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असं कंपनीकडून सांगण्यात आले.