फक्त तेलच नाही, तर व्हेनेजुएलात दडलाय सोन्या-चांदीचा मोठा खजिना; ट्रम्प यांचा त्यावर डोळा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:43 IST2026-01-06T17:42:58+5:302026-01-06T17:43:18+5:30
America Venezuela: डोनाल्ड ट्रम्प आता व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवण्याच्या आणि मोठ्या प्रमाणात तेलाचे उत्पादन सुरू करण्याच्या योजनेवर वेगाने काम करत आहेत.

फक्त तेलच नाही, तर व्हेनेजुएलात दडलाय सोन्या-चांदीचा मोठा खजिना; ट्रम्प यांचा त्यावर डोळा...
America Venezuela: अमेरिकेने कारवाई कलेला व्हेनेजुएला केवळ जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलसाठ्यासाठीच नव्हे, तर प्रचंड सोन्याच्या आणि दुर्मिळ खनिजांच्या (रेअर अर्थ मेटल्स) खजिन्यासाठीही ओळखला जातो. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर फक्त व्हेनेजुएलाच्या तेलापुरती मर्यादित नसून, देशात दडलेल्या सोन्या-चांदीसह इतर मौल्यवान खनिजांवरही असल्याची जोरदार चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे.
तेल, सोने आणि रेअर अर्थ मेटल्सने समृद्ध व्हेनेजुएला
व्हेनेजुएलाची जमीन आणि पर्वतरांगांमध्ये कच्च्या तेलासोबतच सोने, दुर्मिळ खनिजे आणि रेअर अर्थ मेटल्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. ट्रम्प यांनी व्हेनेजुएलावर केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईनंतर जगाला स्पष्ट संदेश दिला होता की, आता व्हेनेजुएलाच्या तेलावर अमेरिकेचा प्रभाव राहील. सोन्या आणि इतर खनिजांबाबत त्यांनी थेट विधान केले नसले, तरीही अमेरिकेची रणनीती संपूर्ण खजिन्यावर नियंत्रण मिळवण्याची असल्याचे मानले जाते.
हजारो टन सोन्याचा खजिना
तेलाव्यतिरिक्त, व्हेनेजुएलाच्या दक्षिण भागातील पर्वतीय क्षेत्रे सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहेत. गुयाना सीमेच्या जवळ असलेल्या भागात गोल्ड क्वार्ट्ज व्हेन्स आढळतात. या खडकांमध्ये सोन्यासह अनेक दुर्मिळ खनिजे आहेत. तज्ज्ञांच्या मते, या भागातील सोने 70 ते 95 टक्के शुद्ध आहे. या परिसरात शेकडो सोन्याच्या खाणी असून, त्यामध्ये हजारो टन सोने दडलेले असल्याचा अंदाज आहे.
जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा
व्हेनेजुएलाकडे सुमारे 303 अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे, जो सऊदी अरेबियापेक्षाही अधिक मानला जातो. मात्र, दीर्घकाळातील खराब व्यवस्थापन, अपुरी गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे व्हेनेजुएलाचे तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. ट्रम्प यांची योजना व्हेनेजुएलाच्या तेलसाठ्यावर थेट नियंत्रण मिळवून अमेरिकन तेल कंपन्यांच्या मदतीने उत्पादन पुन्हा वेगाने सुरू करण्याची असल्याचे सांगितले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून प्रचंड नफा मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.