America President Donald Trump News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानकडून केले जाणारे अनेक दावे फसवे आणि खोटे निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना भारताची भूमिका स्पष्टपणे जगासमोर मांडली. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत आहेत. अमेरिका-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरम येथे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणत ऐतिहासिक कामगिरी केल्याचे म्हटले आहे.
अमेरिका-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरमच्या मंचावरून संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला युद्ध आवडत नाही. शांतता प्रस्थापित करणे आणि एकात्मता निर्माण करणे, हाच माझ्यासाठी मोठा आशावाद आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या हिंसाचाराला थांबवण्यासाठी माझ्या प्रशासनाने ऐतिहासिक युद्धबंदी यशस्वीरित्या केली. मी म्हणालो चला एक करार करूया आणि काही व्यापार करूया. हा व्यापार अण्वस्त्रांचा नको, तर तुम्ही बनवलेल्या सुंदर गोष्टींचा करूया, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते
पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, दोन्ही देशांचे नेते खूप शक्तिशाली, मजबूत आणि हुशार आहेत. हे सर्व थांबले आणि आशा आहे की, ते तसेच राहील. ते प्रत्यक्षात एकत्र येत आहेत. कदाचित आपण त्यांना एकत्र आणून एखाद्या स्नेहभोजनाचे नियोजन करू शकतो. लहान पातळीवर सुरू झालेला संघर्ष दिवसेंदिवस मोठा होत चालला होता. या उग्र होत चाललेल्या संघर्षाचे लाखो लोक बळी ठरले असते, असे ट्रम्प म्हणाले.
आम्ही दोन्ही बाजूंना थेट संवाद राखण्याचे आवाहन करतो
आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे स्वागत करतो. पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांनी शांततेचा मार्ग निवडल्याच्या निर्णयाची प्रशंसा करतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांचा निर्णय शक्ती, शहाणपण आणि धैर्य दर्शवितो. प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी आम्ही दोन्ही बाजूंना थेट संवाद राखण्याचे आवाहन करतो, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातील आण्विक संघर्ष आपण थांबवले, असा दावा करीत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शस्त्रसंधीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. हा संघर्ष थांबवला तर अमेरिका मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांशी व्यापार वाढवील, असे आपण दोन्ही देशांना सांगितल्याचे नमूद करून ट्रम्प यांनी एक प्रकारे व्यापाराचे आमिष दाखवल्यावर हा संघर्ष थांबल्याचे सांगत आपली टिमकी वाजवली. प्रशासनाने शनिवारी भारत-पाकदरम्यानचा धोकादायक संघर्ष थांबवून एक ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचेही ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले, ‘भारत-पाकिस्तान अत्यंत आक्रमक मानसिकतेत होते. आम्ही व्यापाराच्या मुद्द्याआधारे या देशांतील संघर्ष मिटवण्यात मदत केली. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी चर्चेसंदर्भात केलेला दावा भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.