“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 11:45 IST2026-01-11T11:45:40+5:302026-01-11T11:45:40+5:30
America President Donald Trump: मी ८ महिन्यांत ८ युद्धे थांबवली. मला बढाई मारायची नाही; पण इतिहासात माझ्यापेक्षा कोणीही नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिक पात्र नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे म्हटले आहे.

“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
America President Donald Trump: नोबेल पुरस्कार न मिळाल्याचे दुःख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा उगाळले आहे. शांतता नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी माझ्यापेक्षा कुणीच पात्र नाही, असा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चारही ट्रम्प यांनी केला.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काहीही भरीव काम केले नसताना त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले. त्याउलट आपल्या अध्यक्षीय पदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील आठ महिन्यांत मी आठ युद्धे थांबवली आहेत, त्यामुळे मला बढाई मारायची नाही; पण, इतिहासात माझ्यापेक्षा कोणीही नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिक पात्र नाही, असे ठाम वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
'थांबविलेल्या आठ मोठ्या युद्धासाठी नोबेल हवे'
ट्रम्प म्हणाले की, गेल्या वर्षी व्हाइट हाउसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी, दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील संघर्ष थांबवून लाखो लोकांचे प्राण वाचविल्याचे श्रेय मला दिले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही, ते गेली १० वर्षे दोन युद्धे थांबविण्याचा प्रयत्न करीत होते; पण, त्यांना यश आले नाही, अशी आपल्यापुढे कबुली दिली होती. मी थांबविलेल्या प्रत्येक युद्धासाठी नोबेल मिळाले पाहिजे. ही मोठी युद्धे मी थांबवली, असे ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यांबाबत व्हाइट हाउसमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्यावर टीका करताना ओबामा यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी काहीच केले नाही. तरीही त्यांना २००९ मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर नोबेल मिळाले. आपल्याला नोबेल का मिळाले याचे कारण त्यांना माहिती नाही.