आधी ट्रम्प खोटं बोलले, आता पुरस्कार देऊन गोंधळ पसरवला! ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेचा नवा ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:37 IST2025-12-28T13:37:19+5:302025-12-28T13:37:42+5:30
America on India-Pakistan War: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारत-अमेरिकेतील संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे.

आधी ट्रम्प खोटं बोलले, आता पुरस्कार देऊन गोंधळ पसरवला! ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेचा नवा ड्रामा
America on India-Pakistan War: भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष सहाय्यक रिकी गिल यांना अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल (NSC) कडून ‘डिस्टिंग्विश्ड अॅक्शन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामात महत्वाची भूमिका बजापल्याप्रकरणी हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती अमेरिकी सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकन परराष्ट्र मंत्रालय व NSC कडून सन्मान
अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद (NSC) यांच्या वतीने रिकी गिल यांना विशेष सन्मान देण्यात आला. अधिकृत निवेदनानुसार, दक्षिण आशियाशी संबंधित प्रश्नांवर विविध अमेरिकन सरकारी संस्थांमधील समन्वय आणि कूटनीतिक प्रयत्नांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताची भूमिका स्पष्ट
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धविरामात अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती, असे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे. भारत सरकारने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, भारत-पाक सीजफायर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या विनंतीनंतर भारताने स्वीकारला होता आणि या प्रक्रियेत कोणत्याही तृतीय पक्षाची भूमिका नव्हती. काश्मीर प्रश्नावरही भारताने तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला स्पष्ट नकार दिला आहे. तरीदेखील अमेरिकेकडून वारंवार युद्धविरामात महत्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला जातोय.
‘डिस्टिंग्विश्ड अॅक्शन अवॉर्ड’चे महत्त्व
NSC कडून दिला जाणारा ‘डिस्टिंग्विश्ड अॅक्शन अवॉर्ड’ हा संस्थेतील सर्वात प्रतिष्ठेच्या अंतर्गत सन्मानांपैकी एक मानला जातो. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांमध्ये असाधारण योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रिकी गिल यांची निवड त्यांच्या धोरणात्मक समन्वय आणि कूटनीतिक कौशल्यामुळे करण्यात आली.
ट्रम्प प्रशासनातील रिकी गिल यांची भूमिका
नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल (NSC) ही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत सल्ला देणारी महत्त्वाची संस्था आहे. रिकी गिल सध्या अमेरिकी प्रशासनात वरिष्ठ पदावर कार्यरत असून, धोरण समन्वय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर ते काम करत आहेत.