तडजोड कधीच नाही! इराणनं अमेरिकेचा दावा फेटाळला, डोनाल्ड ट्रम्प यांचीही उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:24 IST2026-03-25T13:17:07+5:302026-03-25T13:24:24+5:30
America Israel Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका नव्या वळणावर आला आहे.

तडजोड कधीच नाही! इराणनं अमेरिकेचा दावा फेटाळला, डोनाल्ड ट्रम्प यांचीही उडवली खिल्ली
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता एका नव्या वळणावर आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केल्यानंतर, इराणच्या लष्कराने या दाव्याची खिल्ली उडवली आहे. अमेरिकन लोक सध्या केवळ स्वतःशीच चर्चा करत आहेत, असा टोला इराणने लगावला आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, "आमची इराणसोबत दोन दिवस सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यामुळे आम्ही पुढील पाच दिवस इराणवर हल्ला करणार नाही." मात्र, इराणने अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आणि अमेरिकेने केलेला दावा फेटाळून लावला आहे.
हे देखील वाचा: "भारताची भूमिका महत्त्वाची..., इराणसोबत युद्ध थांबवायचं असेल तर..."; इस्रायलने इराणसमोर ठेवल्या ४ मोठ्या अटी!
इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला
इराणच्या लष्कराच्या 'खतम अल-अंबिया' केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झोल्फघारी यांनी अमेरिकेला आरसा दाखवत कडक शब्दांत टीका केली आहे. एका ताज्या व्हिडिओ संदेशात त्यांनी अमेरिकेच्या सत्तेचा काळ संपत असल्याचे संकेत दिले. ज्या अमेरिकेला जग 'महासत्ता' म्हणून ओळखत असे, त्या सत्तेचे आता मोठ्या अपयशात रूपांतर झाले आहे. अमेरिका आजही स्वतःला जगाचा केंद्रबिंदू आणि एकमेव महासत्ता समजते, पण हे केवळ त्यांचे भ्रम आहेत. अमेरिकेने या मानसिकतेतून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचे आहे. झोल्फघारी पुढे म्हणाले की, "आमचे पहिले आणि शेवटचे शब्द सुरुवातीपासून एकच आहेत आणि तेच राहतील: आमच्यासारखे लोक तुमच्यासारख्या लोकांशी कधीही तडजोड करणार नाहीत."
हे देखील वाचा: इराणचा मास्टरस्ट्रोक! जगात अमेरिकेला एकाकी पाडायची रणनीती? ट्रम्प यांच्या दाव्यावर फेरले पाणी
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?
सोमवारी एका निवेदनात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, गेल्या दोन दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकन लष्कराला पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रांवर किंवा ऊर्जा प्रकल्पांवर कोणताही हल्ला न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ही चर्चा सकारात्मक झाली, तर भविष्यात दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थिती संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, इराणने अमेरिकेसोबत कोणतीही सकारात्मक किंवा अधिकृत चर्चा सुरू नसल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, इराणने स्पष्ट शब्दात बजावले आहे की, ते अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत.
युद्धाची सद्यस्थिती
ट्रम्प यांच्या विधानामुळे जागतिक बाजारात आणि राजनैतिक स्तरावर युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, इराणच्या नकारामुळे हे संकट पुन्हा गडद झाले आहे. ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्याचा अमेरिकेचा निर्णय हा केवळ एकतर्फी पवित्रा ठरतो की इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी केलेली रणनीती, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.