डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशाला उघडपणे दिली धमकी, त्या देशासोबत भारताने मिळवले हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:43 IST2026-01-08T13:42:41+5:302026-01-08T13:43:05+5:30
America-India-France :डॉ. एस. जयशंकर यांच्या दौऱ्याने दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा !

डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशाला उघडपणे दिली धमकी, त्या देशासोबत भारताने मिळवले हात
America-India-France : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्यावर टॅरिफच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेची आणि खिल्ली उडवल्याची आंतरराष्ट्रीय राजकारणात खूप चर्चा झाली. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर फ्रान्सच्या दौऱ्यावर गेल्याने नवीन चर्चांना उधाण आले आहे. जयशंकर यांनी आपल्या दौऱ्यातून भारत–फ्रान्स सहकार्याच्या भूमिकेला अधोरेखित करत जागतिक स्थैर्याबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
मॅक्रों माझ्याकडे विनवणी करत आले होते
डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्यात दावा केला की, फ्रान्समध्ये प्रिस्क्रिप्शन औषधांवरील टॅरिफबाबत चर्चा करताना मॅक्रों यांनी त्यांच्याकडे विनवणी केली होती. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, मॅक्रों माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुम्हाला जे हवे ते करा, पण कृपया हे जनतेला सांगू नका. मी तुमच्याकडे भीक मागतो!
ट्रम्प यांनी असा आरोप केला की, अमेरिकन नागरिक फ्रेंच नागरिकांच्या तुलनेत औषधांसाठी तब्बल 14 पट अधिक पैसे देत आहेत. सुरुवातीला मॅक्रों यांनी औषधांच्या किमती वाढवण्यास नकार दिला, मात्र त्यानंतर ट्रम्प यांनी फ्रान्सला अल्टीमेटम दिल्याचा दावा केला आहे.
Today’s wide-ranging discussions with Foreign Minister @jnbarrot of France were driven by the comfort and depth of our Strategic Partnership.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 7, 2026
Spoke about advancing our bilateral cooperation and taking India - EU engagement to a higher level. Also shared perspectives on… pic.twitter.com/9GLHSOCkww
25 टक्के टॅरिफची धमकी?
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, फ्रान्सने अमेरिकेच्या मागण्या मान्य न केल्यास शॅम्पेन, वाईनसह सर्व फ्रेंच उत्पादनांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देण्यात आली होती. या दबावामुळे अखेर मॅक्रों यांनी अमेरिकेच्या अटी मान्य केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.
जयशंकरांचा फ्रान्स दौरा अन् जागतिक संदेश
या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या युरोपच्या दौऱ्यावर असून, फ्रान्समध्ये त्यांनी आपल्या फ्रेंच समकक्ष नोएल बैरोट यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीदरम्यान जयशंकर यांनी स्पष्ट केले की, जागतिक राजकारण अधिक अस्थिर होत असताना, भारत आणि फ्रान्ससारख्या रणनीतिक भागीदारांनी एकत्र काम करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
मॅक्रों यांच्या भारत दौऱ्याची तयारी
जयशंकर यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्या आगामी भारत दौऱ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, आम्ही राष्ट्राध्यक्ष मॅक्रों यांच्या लवकरच होणाऱ्या भारत दौऱ्याची अपेक्षा करत आहोत. फ्रान्स हा युरोपमधील भारताचा पहिला आणि सर्वात जुना रणनीतिक भागीदार असल्याचेही जयशंकर यांनी नमूद केले.
युरोप दौऱ्यामागचे कारण काय?
युरोप दौऱ्याचे कारण स्पष्ट करताना जयशंकर म्हणाले की, भारताला युरोपसोबतचे संबंध अधिक सखोल करायचे आहेत. FTA (मुक्त व्यापार करार), तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, रेल्वे, संरक्षण आणि विमानवाहतूक क्षेत्रात भारत–युरोप सहकार्याची मोठी संधी आहे. आज जगाला नव्या जागतिक व्यवस्थेवर सखोल चर्चा करण्याची गरज आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.