अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:16 IST2026-01-10T06:13:13+5:302026-01-10T06:16:02+5:30
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचा दावा भारताने अधिकृतपणे फेटाळून लावला.

अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
न्यूयॉर्क/नवी दिल्ली:भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे रखडला, हा अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचा दावा भारताने शुक्रवारी अधिकृतपणे फेटाळून लावला.
लुटनिक यांचे विधान वस्तुस्थितीला धरून नसून पूर्णपणे चुकीचे आहे. गेल्या वर्षभरात दोन्ही नेत्यांमध्ये ८ वेळा चर्चा झाल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ट्रम्प टप्प्याटप्प्याने देशांशी करार करतात. ब्रिटनसोबत आधी करार केला. त्यानंतर ट्रम्प यांना भारतासोबत करार करायचा होता, असे लुटनिक म्हणाले.
...अन् भारताची संधी हुकली
लुटनिक यांनी एका पॉडकास्टमध्ये हा दावा केला होता. ते म्हणाले की, आम्ही भारताला करारासाठी 'तीन शुक्रवार'ची मुदत दिली होती. करार जवळपास अंतिम झाला होता, फक्त मोदींनी ट्रम्प यांना फोन करून त्यावर शिक्कामोर्तब करणे बाकी होते. मात्र, भारतीय बाजूने तो फोन आला नाही आणि ती संधी हुकली. आता तो करार टेबलवर नाही.
भारताचे सडेतोड उत्तर
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, अमेरिकेचे वाणिज्य सचिव लुटनिक यांचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. गेल्या वर्षभरात मोदी आणि ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद झाला आहे. व्यापार करारासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक फेऱ्या झाल्या असून, आम्ही एका संतुलित आणि फायदेशीर करारासाठी अजूनही सकारात्मक आहोत. १४० कोटी जनतेची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत कोणत्याही स्रोतातून स्वस्त तेल खरेदी करण्यास स्वतंत्र आहे, असेही जैस्वाल यांनी म्हटले आहे.