अमेरिकेची ‘शत्रू’च्या मदतीनेच शत्रूवर कुरघोडी; चिनी टॅलेंटचा सर्वाधिक फायदा, AI जगतात रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 06:13 IST2025-11-24T06:12:27+5:302025-11-24T06:13:03+5:30
फक्त मेटाच नाही, तर ॲपल, गुगल, इंटेल आणि सेल्सफोर्ससारख्या अमेरिकन कंपन्यांनीही चिनी संस्थांसोबत मोठी संशोधनं केली आहेत.

अमेरिकेची ‘शत्रू’च्या मदतीनेच शत्रूवर कुरघोडी; चिनी टॅलेंटचा सर्वाधिक फायदा, AI जगतात रस्सीखेच
चीन आणि अमेरिका यांचे संबंध अलीकडच्या काळात बरेच बिघडले आहेत. किंबहुना दोन्ही देश एकमेकांकडे आपले प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहतात. चीनला तर अमेरिकेला मागे टाकून जगातील एकमेव महासत्ता बनायचं आहे. अंतराळाच्या संदर्भातही चीननं अमेरिकेशी पंगा घेतला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) संदर्भातही दोन्ही देशांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करू पाहताहेत. निदान एआयच्या संदर्भात तरी चीनला आपल्या पुढे जाऊ द्यायचं नाही, असा चंग अमेरिकेनंही बांधला आहे. त्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्यांनी कधीचीच तयारी सुरू केली आहे. मेटाचे सीइओ मार्क झकरबर्ग यांनी जूनमध्ये आपल्या नवीन सुपर इंटेलिजन्स लॅबची घोषणा केली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, या प्रोजेक्टमध्ये ११ वैज्ञानिक काम करत आहेत. त्यांचा उद्देश अशी मशीन्स तयार करणं आहे जी मानवी मेंदूपेक्षा जास्त ताकदवान असतील !
न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार यातील एकही वैज्ञानिक अमेरिकन नाही. या अकरापैकी तब्बल सात वैज्ञानिक चिनी, तर इतर चारपैकी भारत, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक वैज्ञानिक आहे.अमेरिकेत कित्येक सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ चीनला एआय क्षेत्रातील आपला सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी आणि धोका मानतात, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेला ज्यांच्यावर मात करायची त्या चिनी तंत्रज्ञांच्या मदतीनंच ते आपला गाडा पुढे ओढताहेत. अमेरिकेत चालणारं मोठं आणि क्रांतिकारी एआय संशोधनही चिनी वैज्ञानिकांच्या मदतीनंच पुढे जातंय. मेटाच्या एआय युनिटचे प्रमुख आहेत चिनचे अलेक्झांडर वॉन्ग आहेत. जून २०२५ मध्ये ते मेटाशी जोडले गेले. त्यांना कंपनीत आणण्यासाठी मार्क झकरबर्ग यांनी तब्बल १.२६ लाख कोटी रुपये खर्च केले !
बहुतांश अमेरिकी कंपन्या चिनी वैज्ञानिकांवर अवलंबून आहेत. मेटामध्ये तर विनोदानं म्हटलं जातं की कंपनीत नवीन येणाऱ्यांना दोन गोष्टी आधी शिकाव्या लागतात.. पहिली गोष्ट म्हणजे मेटानं विकसित केलेली ‘हॅक’ ही कंपनीची प्रोग्रामिंग भाषा आणि दुसरी मँडरिन ही चिनी भाषा. कारण तिथल्या एआय टीममध्ये चिनी वैज्ञानिकांची संख्या खूप मोठी आहे. यंदा मेटाला जवळपास ६,३०० H-1B व्हिसा मंजूर झाले ज्यात चिनी तंत्रज्ञांची संख्या सर्वाधिक आहे. २०२८ पासून मेटानं किमान २८ संशोधनं चिनी संस्थांच्या मदतीनं तयार केली आहेत.
फक्त मेटाच नाही, तर ॲपल, गुगल, इंटेल आणि सेल्सफोर्ससारख्या अमेरिकन कंपन्यांनीही चिनी संस्थांसोबत मोठी संशोधनं केली आहेत. मायक्रोसॉफ्टनं तर सर्वाधिक ९२ महत्वाच्या संशोधनांसाठी भागीदारी केली आहे. ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेनं इमिग्रेशन पॉलिसी अतिशय कडक केली. सिलिकॉन व्हॅलीतही चीनविरोधी भावना वाढली. तरीही अमेरिकेत चिनी संशोधक आणि तंत्रज्ञ फक्त टिकूनच नाही राहिले ताहीत तर तिथे ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पॉलसन इन्स्टिट्यूटनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की जगातील टॉप एआय वैज्ञानिकांमधील जवळपास एक-तृतीयांश वैज्ञानिक चीनमधले असून, त्यातील बहुतेक अमेरिकन संस्थांमध्ये काम करत आहेत. अमेरिकन एआय इंडस्ट्रीला आतापर्यंत चिनी टॅलेंटचा सर्वाधिक फायदा झाला आहे.