अमेरिकेची मोठी घोषणा; "मुज्तबा खामेनेईसह इतर अधिकाऱ्यांची माहिती द्या, 92 कोटी रुपये मिळवा अन्...!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:22 IST2026-03-14T12:22:06+5:302026-03-14T12:22:56+5:30
अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेईकडे इराणची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी काळात इराणच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले जातील असे संकेत दिले आहेत.

अमेरिकेची मोठी घोषणा; "मुज्तबा खामेनेईसह इतर अधिकाऱ्यांची माहिती द्या, 92 कोटी रुपये मिळवा अन्...!"
वॉशिंग्टन - अमेरिका आणि इस्रायलकडून सध्या इराणवर जबरदस्त हल्ले सुरू आहेत. आता अमेरिकेने इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे. मुज्तबा खामेनेई आणि 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'शी (IRGC) संबंधित अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्याला १० दशलक्ष डॉलर अर्थात सुमारे ९२.६० कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकन परराष्ट्र विभागाची घोषणा -
अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या 'रिवॉर्ड्स फॉर जस्टिस' कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी ही मोठी घोषणा करण्यात आली. रिवॉर्ड्स फॉर जस्टिसने X वर एक पोस्ट केली आहे. यात, "तुम्हाला या इराणी दहशतवादी नेत्यांसंदर्बात काही माहिती आहे का? आम्हाला माहिती पाठवा. यामुळे तुम्ही बक्षिसे आणि पुनर्वसनासाठी पात्र ठरू शकता," असे म्हणण्यात आले आहे.
यादीमध्ये कुणाकुणाची नावं? -
या यादीमध्ये प्रामुख्याने, इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई, त्यांच्या कार्यालयाचे उपप्रमुख अली असगर हेजाजी आणि इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांचा समावेश आहे. अमेरिकेने या संदर्भात काही फोटोही प्रसिद्ध केले आहेत.
Got information on these Iranian terrorist leaders?
— Rewards for Justice (@RFJ_USA) March 13, 2026
Send us a tip. It could make you eligible for a reward and relocation. pic.twitter.com/y7avkqdGWw
खामेनेईंच्या मृत्यूनंतर तणाव वाढला:
अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेईकडे इराणची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी काळात इराणच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले जातील असे संकेत दिले आहेत. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. सध्या संपूर्ण मध्यपूर्वेतच युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.