अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:42 IST2025-06-22T12:41:59+5:302025-06-22T12:42:50+5:30
America Attacks Iran: आज पहाटे अमेरिकेने इराणमध्ये घुसून तीन अणु प्रकल्पांवर हल्ला केला.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
America Attacks Iran: गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहाचला आहे. यातच, आज(दि. २२) पहाटे नको ते घडले. अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत.
इस्रायलच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणनकडून इस्रायलवर किमान ३० क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इराणने केलेल्या या हल्ल्याचा आवाज तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेमपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यामुळे इस्रायली नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या अनेक भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराण आक्रमक झाला असून, इस्रायलवर आणखी हल्ले करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी इस्रायली जनतेला सरकारने दिलेल्या सर्व नियामांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांना बंकर किंवा संरक्षित भागात जाण्यास आणि पुढील सूचना मिळेपर्यंत तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, इराणच्या कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांना परतून लावण्यासाठी इस्रायली सैन्य सज्ज झाले आहे.
अमेरिकेचा इरामवर हल्ला
आज पहाटे अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आणि त्यांना नष्ट केले, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. तर, अमेरिकेच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे इराणने म्हटले आहे. या हल्ल्यांनंतर नागरिकांसाठीही कोणता धोका नसल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.