कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 14:28 IST2025-10-23T14:27:46+5:302025-10-23T14:28:39+5:30
विद्यार्थ्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या बातमीने कुटुंब आणि स्थानिक रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे.

कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ पोलीस स्टेशन परिसरातील कफानवाडा गावातील रहिवासी अजित सिंह चौधरी हा बश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी (यूएफए, रशिया) मध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता आहे. विद्यार्थ्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या बातमीने कुटुंब आणि स्थानिक रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे.
कुटुंबाच्या मते, अजितशी १९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता शेवटचं बोलणं झालं होतं. त्या संभाषणानंतर त्याचा मोबाईल बंद आहे. सुरुवातीला कुटुंबाला नेटवर्कची समस्या वाटली होती, परंतु तीन दिवस संपर्क न झाल्यामुळे आता सर्वांना काहीतरी अनुचित घडण्याची चिंता आहे.
बेपत्ता अजित सिंहचा शोध घेत असलेल्या रशियातील स्थानिक पोलिसांना नदीकाठी अजितचे कपडे आणि काही वस्तू सापडल्या आहेत. पोलीस याचा तपास करत आहेत. कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की, अजित त्यांना माहिती न देता इतका वेळ लांब राहू शकत नाही.
अजितच्या वडिलांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि म्हटलं की त्यांचा मुलगा एक मेहनती, जबाबदार आणि हूशार विद्यार्थी होता. आम्हाला भीती वाटते की आमच्या मुलाला काहीतरी झालं आहे. त्याचे कपडे नदीकाठी सापडले आहेत.
कुटुंबाने भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे तात्काळ हस्तक्षेप आणि अजितला लवकरात लवकर शोधण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांनी स्थानिक पोलिसांवर तपास जलद करण्यासाठी दबाव आणण्याची विनंती दूतावासाला केली आहे.
प्रकरणाचं गांभीर्य ओळखून रशियातील भारतीय दूतावासाने तात्काळ स्थानिक प्रशासन आणि विद्यापीठ व्यवस्थापनाशी संपर्क साधला. विद्यापीठ अधिकाऱ्यांनी बेपत्ता झाल्याची पुष्टी केली आहे आणि सांगितले आहे की अजित गेले काही आलेला नाही.