कारवाईच्या धमकीनंतर ड्राण चर्चेला तयार : ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:35 IST2026-01-13T09:35:15+5:302026-01-13T09:35:15+5:30
खामेनेई समर्थक रस्त्यावर, अमेरिकेविरोधात घोषणा

कारवाईच्या धमकीनंतर ड्राण चर्चेला तयार : ट्रम्प
दुबई : इराणमधील आंदोलकांवर बळाचा वापर केल्यास अमेरिकेकडून प्रत्युत्तराची कारवाई करण्याच्या धमकीनंतर, इराणने अमेरिकेशी संपर्क साधला असून चर्चेचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
अमेरिका इराणच्या सरकारशी चर्चा करत असल्याचेही ट्रम्प म्हणाले. पण इराणमध्ये आंदोलक मृतांची संख्या वाढत गेली आणि सरकार आंदोलकांना अटक करत असेल तर अमेरिकेला कारवाई करावी लागेल अशीही धमकी ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेने यापूर्वी इराणला अनेक वेळा मारले आहे. ते मार खाऊन थकले आहेत. ते आता अमेरिकेशी चर्चा करण्याच्या तयारीत आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
खामेनेई समर्थकांचे रस्त्यावर शक्तिप्रदर्शन
सोमवारी इराणने सरकार समर्थक निदर्शकांना रस्त्यावर उतरून धर्मसत्तेच्या समर्थनार्थ निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरून अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबादच्या घोषणा देत होता. येथील देशव्यापी निदर्शनांवरील कारवाईत आजपर्यंत ५४४ जणांचा बळी गेला असून हा आकडा यापेक्षा कितीतरी जास्त असू शकतो, असा अंदाज अमेरिकेच्या 'ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सी'ने व्यक्त केला आहे.
'अमेरिकेला हवा रक्तपात'
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी रविवारी तेहरानमध्ये काही परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांशी संवाद साधताना इराणमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून हिंसाचारासाठी इस्रायल आणि अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
अराघची म्हणाले, इराणला युद्ध 3 नव्हे तर चर्चा हवी आहे. पण इराण स्वसंरक्षणार्थ हल्ले करू शकते. अमेरिकेला इराणमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी हिंसक व रक्तपाताची आंदोलने हवी आहेत. ती झाल्याने अमेरिकेला इराणवर हल्ला करण्याची संधी मिळाली, असे अराघची म्हणाले.
सायबर व लष्करी हल्ला
व्हाइट हाऊसमधील दोन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प आणि त्यांची राष्ट्रीय सुरक्षा टीम इराणविरोधात कोणती पावले उचलावीत याचा संभाव्य विचार करत आहे. या पर्यायात इराणवर सायबर हल्ले आणि अमेरिका किंवा इस्रायलद्वारे थेट लष्करी हल्ल्यांचा समावेश आहे.