संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:39 IST2025-10-06T11:39:10+5:302025-10-06T11:39:46+5:30
कतारमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर सौदीने पाकिस्तानसोबत संरक्षण करार केला होता. या करारामुळे सौदीला पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचं संरक्षण मिळाले. पाकिस्तान एकमेव मुस्लीम देश आहे ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत.

संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
कराची - सौदी अरेबियासोबत झालेल्या संरक्षण करारानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट मिळाली आहे. सौदीची कंपनी Go AI Hub ने पाकिस्तानात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेतंर्गत पाकिस्तानात तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र उघडण्याची तयारी सुरू आहे. ही कंपनी पाकिस्तानातील लोकांना एआयचं शिक्षण देत त्यांना यासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे.
माहितीनुसार, कंपनी पहिल्या टप्प्यात कमीत कमी ५० हजार पाकिस्तानी नागरिकांना प्रशिक्षित करण्याचं प्लॅनिंग आखत आहे. सुरुवातीला १ हजार पाकिस्तानी लोकांना त्यातून रोजगार मिळेल. येणाऱ्या काळात पाकिस्तान एआय सेक्टरमध्ये जवळपास ३० लाख नोकऱ्या उपलब्ध करू शकतो अशी क्षमता बनवली जात आहे. सौदीची कंपनी हे काम पूर्ण करणार आहे. पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला तेव्हापासून ते गुंतवणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. पाकिस्तानला आरोग्य, कम्युनिकेशन आणि इतर क्षेत्रात रियादच्या माध्यमातून डिल हव्या आहेत. अलीकडेच सौदीने हेल्थ सेक्टरमध्ये गुंतवणुकीवर भाष्य केले होते. आता Go AI Hub ने पाकिस्तानात गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
Go AI Hub ही सौदीची कंपनी आहे. जिचे मुख्यालय रियाद येथे आहे. या कंपनीचं मूळ काम अत्याधुनिक एआयच्या माध्यमातून सौदी अरेबियाला सरकारी संस्था आणि व्यवसायाशी जोडते. सप्टेंबर २०२५ मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार झाला. ज्या करारात जर दोन्ही देशांपैकी एखाद्या देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार आहे. कतारमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर सौदीने पाकिस्तानसोबत संरक्षण करार केला होता. या करारामुळे सौदीला पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचं संरक्षण मिळाले. पाकिस्तान एकमेव मुस्लीम देश आहे ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत.
दरम्यान, कतारमधील हमास नेतृत्वावर इस्रायलने हल्ले केल्यावर काही दिवसांनी हा करार करण्यात आला होता. कतार अमेरिकेला समर्थन देणारा महत्त्वाचा देश आहे. हा करार दोन्ही देशांच्या सुरक्षावाढीसाठीचे आणि जागतिक शांततेबद्दल असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. संरक्षण सहकार्य वाढवणे आणि कोणत्याही आक्रमणाचा संयुक्तरीत्या मुकाबला करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे असं पाकिस्तान व सौदी अरेबियाने संयुक्त निवेदनात म्हटले होते.