'इराणनंतर आता आमचा नंबर लावताय का?'; किम जोंग उनचा अमेरिकेवर हल्लाबोल! नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:10 IST2026-01-12T15:08:44+5:302026-01-12T15:10:03+5:30
इराणमधील अंतर्गत धुसफुस आणि अमेरिकेचा संभाव्य हस्तक्षेप यावर जगभराचे लक्ष असतानाच, हुकूमशहा किम जोंग उन यांच्या प्रशासनाने अमेरिकेवर गंभीर आरोप करत संयुक्त राष्ट्रालाही या वादात ओढले आहे.

'इराणनंतर आता आमचा नंबर लावताय का?'; किम जोंग उनचा अमेरिकेवर हल्लाबोल! नेमकं काय झालं?
एकीकडे वेनेझुएला आणि इराणमध्ये लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेसमोर आता उत्तर कोरियाने नवे आव्हान उभे केले आहे. इराणमधील अंतर्गत धुसफुस आणि अमेरिकेचा संभाव्य हस्तक्षेप यावर जगभराचे लक्ष असतानाच, हुकूमशहा किम जोंग उन यांच्या प्रशासनाने अमेरिकेवर गंभीर आरोप करत संयुक्त राष्ट्रालाही या वादात ओढले आहे. "अमेरिका संयुक्त राष्ट्राचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी आणि इतर देशांना बदनाम करण्यासाठी करत आहे," असा घणाघात उत्तर कोरियाने केला आहे.
काय आहे वादाचे मूळ?
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नुकत्याच स्थापन झालेल्या 'बहुपक्षीय निर्बंध देखरेख दला' अर्थात 'एमएसएमटी'मुळे उत्तर कोरियाचा तिळपापड झाला आहे. या विशेष टीममध्ये अमेरिका आणि दक्षिण कोरियासह ११ देशांचा समावेश आहे. उत्तर कोरियावर पुढील १५ वर्षांसाठी कडक आर्थिक आणि लष्करी निर्बंध लादण्याची तयारी ही टीम करत आहे. उत्तर कोरियाने या टीमला पूर्णपणे अवैध ठरवले असून, हा आम्हाला जागतिक स्तरावर गुन्हेगार ठरवण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.
सायबर हल्ल्याच्या आरोपावरून उत्तर कोरिया आक्रमक
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेने उत्तर कोरियावर सायबर हल्ल्यांचेही आरोप केले आहेत. यावर प्रत्युत्तर देताना प्योंगयांगने म्हटले आहे की, "अमेरिका सायबर सुरक्षेच्या नावाखाली आम्हाला जगापासून वेगळे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशा दबावामुळे आम्ही झुकणार नाही." उत्तर कोरियाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर संयुक्त राष्ट्राला खरोखरच पारदर्शक काम करायचे असेल, तर त्यांनी अमेरिकेच्या तालावर नाचणे बंद करून नवीन आणि निष्पक्ष यंत्रणा उभी करावी.
इराणला दिला पडद्यामागून पाठिंबा?
उत्तर कोरियाचा हा विरोध अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिका इराणमध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. इराण, वेनेझुएला आणि उत्तर कोरिया हे तिन्ही देश अमेरिकेचे कट्टर शत्रू मानले जातात. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाने घेतलेली ही भूमिका म्हणजे इराणला दिलेला एक अप्रत्यक्ष पाठिंबा मानला जात आहे. "अमेरिका ज्याप्रमाणे इराणला धमकावत आहे, त्याचप्रमाणे आमच्यावरही निर्बंध लादून आम्हाला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे," असे संकेत किम जोंग प्रशासनाने दिले आहेत.
MSMT म्हणजे काय?
एमएसएमटी ही एक यंत्रणा आहे, जी संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत काम करते. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर निर्बंधांची शिफारस करण्यासाठी २००६ मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. आता १५ वर्षांच्या नवीन निर्बंधांच्या आराखड्यावरून हा वाद विकोपाला गेला आहे. सध्या अमेरिकेने उत्तर कोरियाच्या या विधानावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र यामुळे आशियाई आणि आखाती देशांमधील भू-राजकीय तणाव कमालीचा वाढला आहे.