शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:45 IST2025-05-13T10:44:12+5:302025-05-13T10:45:51+5:30
भारताच्या हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तान बदनाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या कथित अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला करून, आता पाकिस्तानात काहीही आपल्या अवाक्याबाहेर नाही, हे भारताने दाखवून दिले आहे. भारताने अशा पद्धतीने झोडपून काढल्यानंतर, आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची प्रतिक्रिया आली आहे.

शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
भारताकडे वाकड्या नंजरेनं बघितलं की काय हाल होतात, हे पाकिस्ताननं पुन्हा एकदा बघितलं आहे. भारताच्या हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तान बदनाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या कथित अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला करून, आता पाकिस्तानात काहीही आपल्या अवाक्याबाहेर नाही, हे भारताने दाखवून दिले आहे. भारताने अशा पद्धतीने झोडपून काढल्यानंतर, आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची प्रतिक्रिया आली आहे. 'शत्रूचा कोणताही डाव पाकिस्तानी सशस्त्र दलांचा संकल्प कमकुवत करू शकत नाही,' असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी म्हटले आहे.
जनरल मुनीर यांनी सोमवारी रावळपिंडीतील कम्बाइंड मिलिटरी हॉस्पिटलला भेट दिली. यादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. भारतासोबत झालेल्या लष्करी चकमकीत जखमी झालेल्या सैनिक आणि नागरिकांच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी ते तेथे पोहोचले होते. गेल्या २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत, भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरला सुरूवात केली होती. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले चढवून ते भूईसपाट करण्यात आले.
ऑपरेशन बुनयान उल मरसूसवरही मुनीर यांचं भाष्य -
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर सोमवारी भारतीय हल्ल्यांत जखमी झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले, संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांसोबत एकजुटीने उभा आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशन बुनयान उल मरसूसवरही भाष्य केले आणि तो हक्काच्या लढाईचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्येही देशाच्या सशस्त्र दलांचे कौतुक करणारा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानी सैन्याची मोठी बदनामी झाली आहे.