स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:56 IST2025-08-13T11:54:43+5:302025-08-13T11:56:14+5:30

येत्या २ महिन्यात इस्रायल आणि हमासच्या युद्धाला दोन वर्ष पूर्ण होतील. मागच्या २२ महिन्यांत गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

After explosions and famine, diseases are rife in Gaza, people are dying; Shocking revelation in Lancet report | स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

गाझामधील लोकांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. येत्या २ महिन्यात इस्रायल आणि हमासच्या युद्धाला दोन वर्ष पूर्ण होतील. मागच्या २२ महिन्यांत गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. आतापर्यंत तब्बल ६० हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर, अनेक लोक जखमी झाले आहेत. यातील काही लोकांचा जीव भुकेने गेलाय, तर काही लोक स्फोटात मृत्यूमुखी पडले आहेत. पण गाझामधील मृत्यूची कहाणी इथेच संपत नाही. आता एका अहवालातून असे समोर आले आहे की गाझामध्ये सामान्य आजारही प्राणघातक बनले आहेत.  

नुसताच 'द लॅन्सेट'चा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, गाझामध्ये आता असे आजार पसरत आहेत, जे अँटीबायोटिक्सनेही बरे होत नाहीत. या अहवालात म्हटले आहे की, जर असे झाले तर हे आजार लोकांमध्ये जास्त काळ टिकतील, गंभीर होतील आणि इतरांमध्ये यांचा संसर्ग होऊन मृत्यूचा धोका वाढतच जाईल.

लॅन्सेटचा अहवाल काय म्हणतो?
हा अहवाल लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीजेस नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, पहिल्यांदाच असे समोर आले आहे की गाझामध्ये मल्टी-ड्रग-रेजिस्टेंट जीवाणूंचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. म्हणजेच ते जीवाणू इतके मजबूत झाले आहेत की, औषधे त्यांच्यावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे कठीण होते.

आता ही परिस्थिती केवळ गाझाच नाही, तर आज संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनली आहे. लॅन्सेटने या अभ्यासासाठी गाझाच्या अल अहली हॉस्पिटलमधून १३०० हून अधिक नमुने घेतले. बहुतेक नमुने हवाई हल्ल्यात किंवा स्फोटात जखमी झालेल्या लोकांचे होते. यापैकी दोन तृतीयांश नमुन्यांमध्ये असे बॅक्टेरिया होते, जे अनेक प्रकारच्या औषधांनी देखील नष्ट होत नव्हते.

हा धोका वेगाने वाढू शकतो!
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, त्यांना गाझामध्ये वैद्यकीय साहित्याचा साठा करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल. सध्या, गाझामधील अर्ध्याहून अधिक औषधे संपली आहेत, रुग्णालये २४०% पेक्षा जास्त भरली आहेत आणि फक्त अर्धी रुग्णालये आणि दवाखाने अंशतः कार्यरत आहेत. संशोधन पथकाचे म्हणणे आहे की जर युद्ध, रुग्णालये आणि जलसंयंत्रांवर हल्ले थांबले नाहीत, तर हे औषध-प्रतिरोधक रोग संकट आणखी वेगाने वाढेल.

Web Title: After explosions and famine, diseases are rife in Gaza, people are dying; Shocking revelation in Lancet report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.