Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 10:13 IST2025-09-08T10:10:21+5:302025-09-08T10:13:15+5:30
israel and Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले.

Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडले. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला करून युद्धाची सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच हमासने युद्ध न थांबवल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असाही त्यांना इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, प्रत्येकाला घरी पोहोचायचे आहे आणि हे युद्ध संपवायचे आहे. इस्रायलींनी माझ्या अटी मान्य केल्या आहेत. आता हमासनेही स्वीकारण्याची वेळ आली आहे. मी हमासला अटी मान्य न करण्याच्या परिणामांबद्दल इशारा दिला आहे. ही माझी शेवटची चेतावणी आहे, आता अशी कोणतीही चेतावणी येणार नाही! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद."
दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलमध्ये घुसून एक हजाराहून अधिक लोकांना ठार केले, ज्यावर संपूर्ण जगाने टीका केली. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत हमासविरुद्ध मोहीमही सुरू केली. हमासच्या मते, आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात ६३ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १ लाख ६० हजार ९१४ लोक जखमी झाले, अशी माहिती आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन प्रस्तावावर इस्रायल गंभीरतेने विचार करत आहे. या प्रस्तावानुसार, युद्धबंदीच्या पहिल्या दिवशी हमासला 48 लोकांना सोडावे लागेल. त्या बदल्यात इस्रायलला हजारो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी लागेल. याव्यतिरिक्त, गाझा पट्टीत युद्धबंदी कशी लागू करायची यावरही चर्चा होईल. एका इस्रायली अधिकाऱ्याने यावर जास्त भाष्य करणे टाळले असले तरी, हा प्रस्ताव गांभीर्याने विचारात असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, युक्रेनवरील हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला थेट इशारा दिला आहे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन चर्चा करावी, असे त्यांनी सुचवले होते. मात्र, रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी त्यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला. त्यामुळे युक्रेन आणि रशियामधील चर्चा होऊ शकली नाही. आता रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.