चीनमध्ये कोरोनानंतर आता पुराचं थैमान, 106 जणांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 17:31 IST2020-07-04T17:20:54+5:302020-07-04T17:31:17+5:30
अद्याप कोरोना व्हायरसच्या दहशतीतून येथील लोक पूर्णपणे बाहेरही पडलेले नव्हते. तोच पावसाने येथील परिस्थिती अणखीनच भयावह केली आहे.

चीनमध्ये कोरोनानंतर आता पुराचं थैमान, 106 जणांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान
यिचांग -चीनमध्ये कोरोनानंतर आता पावसाने आणि पुराने थैमान घातले आहे. येथे झालेल्या पावसाने आतापर्यंत तब्बल 106 जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे. चीनच्या यिचांग शहरात पावसामुळे घाणेरडे पाणी लोकांच्या कमरेपर्यंत आले होते.
येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर गाड्यादेखील या पाण्यात अडकल्या आहेत. रस्त्यांना अक्षरशः कॅनलचे स्वरूप आले आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले शहर यंगशुओमध्ये ढगफुटीची घटनाही घडली आहे. या पावसामुळे दक्षिण चीनमध्ये मोठे नुकसान झाले आहे. येथे तब्बल 15 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.
येथे कोसळणाऱ्या पावसाचा सर्वधिक फटका हुबेई प्रांताला बसला आहे. यापूर्वी येथे कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. आता या प्रांताला पावसाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागत आहे. येथे एवढे पाणी साचले आहे, की लोकांना आपले घर-दार सोडून सुरक्षित स्थळी जावे लागत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनचा हा प्रांत बरेच दिवस बंद होता. आता काही दिवसांपासून येथील वातावरण पूर्व पदावर येत असतानाच पावसाने कहर केला आहे.
अद्याप कोरोना व्हायरसच्या दहशतीतून येथील लोक पूर्णपणे बाहेरही पडलेले नव्हते. तोच पावसाने येथील परिस्थिती अणखीनच भयावह केली आहे. येथील कोल सांगतात, की आम्ही आधीच कोरोनामुळे त्रस्त होतो. त्यातच आता पावसानेही भर घातली आहे. सांगण्यात येते, की जून महिन्यात मुसळधार पावसामुळे चीनच्या नद्यांची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते. यामुळे येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण होते.
खरेतर येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चीन सरकार आधीच प्रयत्न करत असते. मात्र, यावेळी कोरोना व्हायरसमुळे तयारी करायला सरकारला वेळ मिळाला नाही. यामुळे येथील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. येथील हवामान खात्याने शनिवारपासून चीनच्या नैऋत्य भागात आणखी मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?
दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही!
लडाखच्या 'कुरुक्षेत्रावर' मोदी असं काही बोलले; जवानांमध्ये १२ हत्तींचे बळ संचारले!
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!