अफगाणिस्तान प्रकरणी UNSC मध्ये आपात्कालिन बैठक; महासचिव गुटेरेस म्हणाले, "आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 22:33 IST2021-08-16T22:32:20+5:302021-08-16T22:33:21+5:30
Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानमधील तालिबानच्या ताब्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीबद्दल UNSC मध्ये सोमवारी पार पडली आपात्कालिन बैठक.

अफगाणिस्तान प्रकरणी UNSC मध्ये आपात्कालिन बैठक; महासचिव गुटेरेस म्हणाले, "आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं"
अफगाणिस्तानवरतालिबाननं मिळवलेल्या ताब्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं (UNSC) सोमवारी आपात्कालिन बैठक बोलावली होती. यामध्ये संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटनियो गुटेरेस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. अफगाणिस्तानला पुन्हा कधी दहशतवादी संघटनांसाठी पएक सुरक्षित स्थान म्हणून वापरता येऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं, असं गुटेरेस म्हणाले होते.
"अफगाणिस्तानमध्ये जागतिक दहशतवादी धोक्याच्या विरोधात युएनएससी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येऊन काम करण्याचं मी आवाहन करतो. आम्हाला संपूर्ण देशातून मानवाधिकारावर निर्बंधांची आश्चर्यचकीत करणारे अहवाल मिळत आहेत. मी विशेषत: अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या विरोधात वाढत असलेल्या मानवाधिकाऱ्यांच्या उल्लंघनाबाबत चिंतीत आहे, ज्यांना पुन्हा जुने काळे दिवस परत येण्याची भीती वाटत आहे," असं गुटेरेस म्हणाले.
"अफगाणिस्तानमध्ये मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी एकत्र आवाज उठवला पाहिजे. मी तालिबान आणि सर्व पक्षांकडे आंतरराष्ट्रीय कायदे आणि सर्व व्यक्तींच्या अधिकार आणि स्वातंत्र्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्याचं आवाहन करतोय," असंही त्यांनी नमूद केलं.
I urge the UNSC & international community to stand together, act together & work together use use all tools at their disposal to suppress the global terrorist threat in Afghanistan & to guarantee that basic human rights will be respected: UN Secretary-General António Guterres pic.twitter.com/HBqwvZEj89
— ANI (@ANI) August 16, 2021
तालिबाननं संयम बाळगावा
लोकांच्या आय़ुष्याच्या सुरक्षेसाठी अधिक संयम राखावा आणि लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जाव्या हे याची काळजी घ्यावी असं तालिबानला सांगत असल्याचंही गुटेरस म्हणाले. संघर्षामुळे हजारो लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे. सर्व देशांनी आपल्याकडे येणाऱ्या निर्वासितांना आश्रय द्यावा अशी विनंतीही मी करत आहे. असं त्यांनी सांगितलं.
काबुलवरही प्रतिक्रिया
गुटेरस यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या सध्याच्या परिस्थितीवरही प्रतिक्रिया दिली. "काबुलमध्ये देशातील अनेक प्रातांमधून लोक आले आहेत. सर्वांच्या रक्षासाठी असलेल्या कर्तव्यांची मी आठवण करून देत आहे," असंही गुटेरेस यांनी नमूद केलं. "आज मी अफगाणिस्तानच्या लाखो लोकांच्यावतीनं बोलत आहे. मी त्या लाखो अफगाण मुली आणि महिलांच्या बाजूनं बोलत आहे, ज्या शाळेत जाण्याची, आर्थिक आणि सामाजिक जीवनात भाग घेण्याचं स्वातंत्र्य गमावणार आहेत," असं अफगाणिस्तानच्या प्रतिनिधीनं सांगितलं.