अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 20:55 IST2025-09-02T20:54:57+5:302025-09-02T20:55:15+5:30
अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात मंगळवारी (२ सप्टेंबर) ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात मंगळवारी (२ सप्टेंबर) ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रॉयटर्सने 'जीएफझेड'च्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. याआधी, सोमवारी ६.० तीव्रतेच्या भूकंपात सुमारे १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३,००० हून अधिक जखमी झाले होते. एका दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि मदतकार्यातही अडथळे येत आहेत.
मदतकार्यात अडथळे
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते युसूफ हमाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवले जात असल्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढू शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या भूकंपाने झालेल्या भूस्खलनामुळे अनेक मुख्य रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे मदत आणि बचाव पथकांना वेळेवर प्रभावित भागांमध्ये पोहोचता येत नाहीये.
भारताची मदतीसाठी तत्परता
अफगाणिस्तानात झालेल्या या विध्वंसक भूकंपाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत शोकाकुल कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही या आपत्तीबद्दल चिंता व्यक्त करत अफगाणिस्तानसोबत भारताची एकजूट दाखवली आणि मदतीचे आश्वासन दिले. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि नुकत्याच झालेल्या भूकंपात झालेल्या हानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना केली आणि या दुःखाच्या प्रसंगी भारताकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
भारताने काबुलमध्ये १००० कुटुंबांसाठी तंबू उपलब्ध करून दिले आहेत. भारतीय मिशनने काबुलहून कुनारपर्यंत १५ टन अन्नसामग्री पाठवली आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या संवादाची पुष्टी केली असून मुत्ताकी यांनी मदत पोहोचवल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत.
संयुक्त राष्ट्रांकडूनही मदतीचे आवाहन
संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार आयुक्त वोल्कर टर्क यांनी या विध्वंसक भूकंपाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी 'एक्स'वर लिहिले, "या विध्वंसक भूकंपाच्या वेळी माझी सहानुभूती अफगाणिस्तानच्या लोकांसोबत आहे. हा देश आधीच अनेक अडचणींचा सामना करत आहे." संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये यूएनच्या टीम्स तात्काळ सक्रिय झाल्या असून प्रभावित भागांतील गरजू लोकांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील.