खोल गुहा, किर्र अंधार, वाकडेतिकडे वाटा; 'तो' जमिनीखाली ४,१८६ फूट गेला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 09:20 AM2023-09-21T09:20:54+5:302023-09-21T09:21:21+5:30

या मोहिमेत अमेरिका, हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि युक्रेन या देशातील २०० लोकांनी भाग घेतला.

A very experienced caver named Mark Dickey went to a cave in the Taurus Mountains in southern Turkey. | खोल गुहा, किर्र अंधार, वाकडेतिकडे वाटा; 'तो' जमिनीखाली ४,१८६ फूट गेला आणि...

खोल गुहा, किर्र अंधार, वाकडेतिकडे वाटा; 'तो' जमिनीखाली ४,१८६ फूट गेला आणि...

googlenewsNext

डोंगर चढणे या साहसी क्रीडाप्रकाराबद्दल बहुतेक सगळ्यांनी केव्हा ना केव्हा ऐकलेलं असतं. अनेक लोकांनी किमान त्यांच्या लहानपणी डोंगर चढलेला असतो. त्यात लागणारी कौशल्य, येणारी मजा, वाटणारी भीती आणि असलेले धोके याची लोकांना थोडीफार का असेना, पण कल्पना असते. पण त्याच प्रकारच्या, पण जमिनीच्या पोटात जाणाऱ्या क्रीडा प्रकाराबद्दल मात्र विशेष माहिती नसते, ती म्हणजे केव्हिन्ग! केव्हिन्ग म्हणजे काय ? थोडक्यात सांगायचं तर नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या गुहांच्या पोटात शिरायचं, शक्य तितकं खोल खोल जायचं आणि परत बाहेर यायचं. हे करण्यासाठी अर्थातच बऱ्याच साधनसामग्रीची आणि कौशल्याची गरज असते. कारण जगातील अनेक गुहा या काही शे फूट खोल आहेत. आणि त्या गुहांमध्ये जाऊन परत येणारे केव्हरदेखील जगात आहेत.

दक्षिण तुर्कस्थानमधल्या टॉरस डोंगररांगांमधील एका गुहेत मार्क डिकी नावाचा असा एक अतिशय अनुभवी केव्हर गेला. तिथे गुहेच्या आतील वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या, त्यावर काही संशोधन करणाऱ्या टीमचा तो एक अनुभवी सदस्य होता. तो तिथे जाऊन, पोटाच्या विकाराने आजारी पडला. इतका, की त्याला उठताही येईना. आता जमिनीच्या खोल खोल आत असलेल्या माणसाला मदत तरी कशी पोचवणार ? बरं, मार्क डिकी ज्या गुहेत होता ती गुहा जमिनीपासून ४,१८६ फूट खोल आहे. त्या गुहेत आधी जाऊन आलेल्या हंगेरीच्या ऍग्नस बेरेंट्स नावाच्या फोटोग्राफरने  सांगितलं, की त्या गुहेत अनेक फूट उभे स्तंभ आहेत. खोल खोल खड्डे आहेत. एका वेळी जेमतेम एक माणूस जाऊ शकेल अशा अरुंद पायवाटा आहेत. हे सगळं जमिनीत खोलवर असल्यामुळे तिथलं वातावरण अतिशय दमट आणि थंड असतं. तापमान ४ डिग्री सेल्सिअस इतकं कमी असतं. 

अशा अवघड ठिकाणी गेलेला असताना मार्क डिकीला अनपेक्षितपणे पोटाचा त्रास सुरू झाला. त्याला पोटात रक्तस्राव होऊ लागला. आणि त्यामुळे त्याला इतका थकवा आला की, त्याला आपलं आपण बाहेर येता येईना. तो अक्षरशः मृत्यूच्या दारात जाऊन पोचला. अर्थात, अशा खोल गुहांमध्ये जाणं हे एकट्यादुकट्याचं काम नसतं. तिथे जातांना बरोबर टीम असते, कितीही खोल गेलं तरी बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येईल, याची यंत्रणा असते. त्यामुळेच त्याच्या परिस्थितीची माहिती बाहेरच्या जगाला समजली. पण, तो कितीही गंभीर परिस्थितीत असला तरी त्याच्यापर्यंत मदत पोचवणं सोपं नव्हतं.

ही गुहा हजारो फूट खोल आहे. त्यामुळे अर्थातच तिथे किर्र अंधार आहे. त्यात अनेक वाकडेतिकडे वाटा असतात. अनेक वेळा या प्रकारच्या जटिल गुहांमध्ये भले भले अनुभवी केव्हर्सदेखील रस्ता चुकून हरवून जाऊ शकतात. मात्र नशिबाने मार्क डिकीला वैद्यकीय प्रथमोपचाराचं ज्ञान होतं. त्यामुळे त्याने त्याच्या मते त्याला कुठली औषधं तातडीने हवी आहेत ते कळवलं आणि तुर्कस्थान सरकारने त्यावर कुठलेही प्रश्न न विचारता तातडीने ती मदत त्याला पोचवली. प्रथमोपचार त्याच्यापर्यंत पोचवल्यावर त्याला गुहेतून बाहेर काढण्यासाठी एक मोठी आंतरराष्ट्रीय मोहीमच सुरू झाली.

या मोहिमेत अमेरिका, हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि युक्रेन या देशातील २०० लोकांनी भाग घेतला. हे लोक गुहांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा आणि लोकांना वाचवण्याचा अनुभव असलेले रेस्क्यू वर्कर्स होते. आणि अर्थातच या प्रकारच्या कामाचा अनुभव असलेले डॉक्टर्सही होते. एकदा गुहेत उतरल्यानंतर ही टीम विभागून वेगवेगळ्या सात पातळ्यांवर काम करत होती. या टीमने दिवसरात्र काम करून मार्क डिकीला जमिनीखाली ५९० फूट इतक्या पातळीपर्यंत वर आणण्यात यश मिळवलं. या सगळ्या काळात सतत होणाऱ्या अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याची तब्येत इतकी बिघडली की, त्याला तितक्या खोलीवर एकदा रक्त द्यावं लागलं. पण टीमने सगळं कौशल्य पणाला लावून त्याला त्याही परिस्थितीतून वाचवलं. आणि शेवटी त्याला अक्षरशः हार्नेस बांधून दोराने ओढून बाहेर काढलं.

या सगळ्यावर मार्क डिकी म्हणाला, “मी अजिबात अपेक्षित नसलेल्या वैद्यकीय अडचणीमुळे अनपेक्षितपणे फार जास्त काळ जमिनीखाली राहिलो. पुन्हा जमिनीच्या वर यायला फारच छान वाटतं आहे. यासाठी मी सगळ्या रेस्क्यू टीमचे आणि तुर्कस्थान सरकारचे आभार मानतो.” 

गुफ्रे दे पॅडिरॅक : पहिलं केव्हिन्ग 
केव्हिन्ग या प्रकारची साहसी क्रीडाप्रकार म्हणून सुरुवात केली ती एडोर्ड-आल्फ्रेड मार्टेल (१८५९-१९३८) याने. तो १८८९ साली सगळ्यात पहिल्यांदा फ्रान्समधील गुफ्रे दे पॅडिरॅक नावाच्या ठिकाणी पहिल्यांदा या प्रकारे गुहेत उतरला. आणि १८९५ साली त्याने गेपिंग गिलमध्ये पहिल्यांदा ओल्या ११० मीटर खोलीच्या उभ्या भुयारात उतरणं साध्य केलं.

Web Title: A very experienced caver named Mark Dickey went to a cave in the Taurus Mountains in southern Turkey.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.