‘टायटॅनिक’वरील सोन्याचं घड्याळ...किंमत २१ कोटी; घडवला नवा इतिहास, आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 08:41 IST2025-11-27T08:40:53+5:302025-11-27T08:41:24+5:30
दुर्घटनेनंतर काही दिवसांनी जेव्हा इसिडोर स्ट्राउस यांचं शव अटलांटिक समुद्रातून बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्यांच्या सामानात १८ कॅरेट सोन्याचं ज्यूल्स जर्गेनसन पॉकेट वॉचही होतं

‘टायटॅनिक’वरील सोन्याचं घड्याळ...किंमत २१ कोटी; घडवला नवा इतिहास, आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले
शंभर वर्षांपूर्वी बुडालेल्या त्या काळच्या महाकाय टायटॅनिक जहाजाविषयी लोकांची उत्सुकता आणि त्या वेळी काय घडलं होतं याबद्दल जाणून घेण्याची त्यांची उत्कंठा अजूनही शाबूत आहे. आज इतक्या वर्षांनंतरही त्याबाबतच्या प्रत्येक घटनेकडे लोक आकर्षिले जातात. त्यामुळेच टायटॅनिकशी संबंधित प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वस्तू ‘नवा इतिहास’ घडवत असते.
ज्या वेळेस टायटॅनिक बुडालं, त्यावेळी या जहाजातील एका प्रवाशाच्या सोन्याच्या घड्याळाचा नुकताच लिलाव झाला आणि त्यानं आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले. टायटॅनिक जहाज दुर्घटनेच्या वेळी यात प्रवास करत असलेले उद्योगपती इसिडोर स्ट्राउस यांचं सोन्याचं ‘पॉकेट वॉच’ लिलावात १.७८ दशलक्ष पाउंड म्हणजेच सुमारे २१ कोटी रुपयांना विकलं गेलं. हा एक विक्रम आहे. टायटॅनिकशी संबंधित कोणत्याही वस्तूला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे.
शंभर वर्षांपूर्वी जेव्हा टायटॅनिक समुद्रात उतरवण्यात आलं, त्यावेळी म्हटलं गेलं होतं की, खुद्द देवसुद्धा या जहाजाला बुडवू शकणार नाही! पण अल्पावधीतच म्हणजे १४ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिकला जलसमाधी मिळाली आणि तब्बल १५०० प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. इंग्लंडच्या साउथॅम्प्टनहून अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे जात असताना अटलांटिक महासागरात टायटॅनिकची दुर्दैवी अखेर झाली होती.
याच जहाजातून त्यावेळी इसिडोर स्ट्राउस आणि त्यांची पत्नी आयडा प्रवास करीत होते. यानिमित्तानं त्यांचीही प्रेमकहाणी पुन्हा एकदा समोर आली आहे. टायटॅनिक बुडायला लागल्यानंतर स्ट्राउस यांची पत्नी आयडाला बोटीत जागा मिळाली होती, पण नवऱ्याला सोडून एकटीनंच बोटीनं जाण्यास त्यांनी नकार दिला आणि नवऱ्यासोबतच राहणं पसंत केलं. शेवटी या दुर्घटनेत दोघांचाही बुडून मृत्यू झाला!
दुर्घटनेनंतर काही दिवसांनी जेव्हा इसिडोर स्ट्राउस यांचं शव अटलांटिक समुद्रातून बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्यांच्या सामानात १८ कॅरेट सोन्याचं ज्यूल्स जर्गेनसन पॉकेट वॉचही होतं. पुढे हे घड्याळ स्ट्राउस कुटुंबानं जपून ठेवलं. ब्रिटनमध्ये या घड्याळाचा नुकताच लिलाव झाला. हे ऐतिहासिक घड्याळ आपल्यालाच मिळावं यासाठी लिलावात श्रीमंतांची अक्षरश: झुंबड उडाली होती. शेवटी ही बोली २१ कोटीं रुपयांपर्यंत गेली!
या घड्याळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी हे घड्याळ मिळालं, त्यावेळी त्यात ०२:२० वाजलेले होते आणि घड्याळ बंद पडलेलं होतं. हाच तो क्षण होता जेव्हा टायटॅनिक समुद्राच्या लाटांखाली गेलं होतं! स्ट्राउस यांच्या पत्नी आयडा यांनी १८८८मध्ये आपल्या पतीच्या ४३व्या वाढदिवसाला हे घड्याळ त्यांना भेट दिलं होतं. यावर स्ट्राउस यांच्या नावातील पहिली अक्षरं कोरलेली आहेत. इसिडोर स्ट्राउस यांचा पणतू केनेथ हॉलिस्टर स्ट्राउसनं हे घड्याळ दुरुस्त करून जतन करून ठेवलं होतं.
स्ट्राउस हे एक अमेरिकन उद्योगपती, राजकारणी आणि न्यूयॉर्कच्या मेसीज डिपार्टमेंट स्टोअरचे सह-मालक होते. त्या काळी ते शहरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जात. गेल्या वर्षीही टायटॅनिकशी संबंधित एका सोन्याच्या घड्याळानंच विक्रीचा उच्चांक केला होता. त्यावेळी ते घड्याळ १.५६ दशलक्ष पाऊंडला विकलं गेलं होतं. हे घड्याळ बचाव पथकातील एका कॅप्टनला देण्यात आलं होतं. बुडत असलेल्या टायटॅनिकमधील ७०० प्रवाशांचे प्राण त्यानं वाचवले होते!