एलन मस्क आणि विकिपीडियाचे जिमी वेल्स यांच्यात वाद शिलगला! काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:25 IST2025-01-23T14:24:24+5:302025-01-23T14:25:57+5:30
Elon Musk Jimmy Wales: एलन मस्क आणि विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांच्यात वाद सुरू झाला आहे. तो कशावरून सुरू झालाय आणि दोघांमधील वैर कधीपासून सुरू आहे?

एलन मस्क आणि विकिपीडियाचे जिमी वेल्स यांच्यात वाद शिलगला! काय घडलं?
Elon Musk Jimmy Wales: प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क आणि विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध भडकले आहे. विकिपीडिया खरेदी करण्यावरून सुरू झालेला हा वाद आता नाझी सॅल्यूटपर्यंत पोहोचला आहे. आता एलन मस्क आणि जिमी वेल्स हे एकमेकांवर शाब्दिक वार करताना दिसत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
याची सुरूवात झाली डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर. आनंद व्यक्त करताना एलन मस्क यांनी सॅल्यूट केला. लोकांनी त्याला नाझी सॅल्यूट असल्याचे म्हटले. जिमी वेल्स यांनीही याच मुद्द्यावरून एलन मस्क यांना घेरले.
नाझी सॅल्यूटवरून सुरू झाला वाद
एलन मस्क यांच्या कथित नाझी सॅल्यूटवरून वादविवाद सुरू झाला. यात विकिपीडियाने उडी घेतली. विकिपीडिया पेजवर यांची दखल घेण्यात आली. 'ट्रम्प यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यादरम्यान आपल्या भाषणात मस्क यांनी दोन वेळा आपला उजवा हात उंचावला. याची तुलना नाझी वा फॅसिस्टवादी सॅल्यूटशी केली गेली', असे विकिपीडियावर म्हटले गेले.
एलन मस्क यांनी अशा पद्धतीने हात उंचावण्यात असा कोणत्याही प्रकाराचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. मस्क म्हणाले, 'विकिपीडियाकडून माध्यमांचा प्रोपगंडा वैध स्त्रोत मानला जातो. त्यामुळे स्वाभाविक आहे की, मीडिया प्रोपगंडाला प्रोत्साहन देणारा वारसा बनून जातो.'
जिमी वेल्स यांचा एलन मस्क यांना सवाल
एलन मस्क यांनी केलेल्या टीकेनंतर जिमी वेल्स यांनी उलट सवाल केला. 'जे काही लिहिले गेले आहे, ते एक तथ्य आहे. पण, यात असे काही आहे का, जे तुम्हाला चुकीचे वाटते? हे खरं आहे की, तुम्ही असा इशारा दोन वेळा केला आणि लोकांनी याची तुलना नाझी सॅल्यूटशी केली. आणि हे सत्य आहे की, याचाही काहीही अर्थ नाही म्हणत तुम्ही ते फेटाळलं. हा प्रोपगंडा नाही तथ्य आहे", वेल्स म्हणाले.
मस्क आणि वेल्स यांच्यात वाद का?
एलन मस्क आणि जिमी वेल्स यांच्यातील वैर जुनं आहे. दोघांमध्ये वैचारिक भांडण आहे. एलन मस्क विकिपीडियाला कट्टर डावे समर्थक समजतात. २०२२ मध्ये ४४ बिलियन डॉलरमध्ये एक्स (पूर्वीचे ट्विटर) खरेदी केल्यानंतर वेल्स यांनी मस्क यांना ट्रोल केले होते.
'मला वाटतं की, एलन या गोष्टींमुळे आनंदी नाहीये की, विकिपीडिया विक्रीसाठी खुला नाही. मला आशा आहे की, आम्हाला फंड मिळू नये म्हणून त्यांनी जी प्रचार मोहीम चालवली, ती बघून सत्याची काळजी करणाऱ्या लोकांकडून खूप फंड मिळेल. जर एलन यांना मदत करायची असेल, तर दयाळू आणि विचार करणाऱ्या बौद्धिक लोकांना यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करतील', असे वेल्स म्हणाले होते.
त्यावर मस्क यांनी म्हटले होते की, 'खरंतर कट्टर डावे या गोष्टीमुळे त्रस्त आहेत की, त्यांना हमासची प्रशंसा करताना मला नाझी म्हणण्यासाठी त्यांच्या व्यस्त दिवसातून वेळ काढावा लागला.'