अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 20:04 IST2026-01-09T20:03:49+5:302026-01-09T20:04:32+5:30
America vs China Russia: या युद्धाभ्यास सरावाला Will For Peace म्हणजेच 'शांततेसाठीचा प्रयत्न' असे म्हटले जात आहे

अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
America vs China Russia: अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी त्यांच्याविरोधात संयुक्त आघाडी उघडली आहे. रशिया, चीन आणि इराण यांनी दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ संयुक्त नौदल सराव सुरू केला आहे. या सरावाकडे ब्रिक्स राष्ट्रांच्या वाढत्या लष्करी आणि धोरणात्मक एकतेचे स्पष्ट चिन्ह म्हणून पाहिले जात आहे. या आंतरराष्ट्रीय नौदल सरावाला पूर्वेकडील देशांचा युद्धाभ्यास MOSI III म्हणून ओळखले जात होते. परंतु यावेळी त्याला Will for Peace असे एक नवीन नाव देण्यात आले आहे.
चीन या सरावाचे नेतृत्व करत आहे, तर दक्षिण आफ्रिका त्याचे आयोजन करत आहे. जरी हा सराव अधिकृतपणे ब्रिक्सच्या छत्राखाली आयोजित केला जात नसला तरी, सहभागी देशांच्या सहभागाकडे ब्रिक्स देशांचे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. दक्षिण आफ्रिका, चीन आणि रशिया हे ब्रिक्स सदस्य आहेत, तर इराण अलीकडेच या गटात सामील झाला आहे.
या लष्करी सरावाचा उद्देश काय आहे?
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संरक्षण दलाच्या मते, या सरावाचे उद्दिष्ट सागरी सुरक्षा वाढवणे, संयुक्त लष्करी प्रक्रिया मजबूत करणे आणि महत्त्वाच्या शिपिंग मार्गांचे संरक्षण करणे आहे. तथापि, तज्ञांचा असा विश्वास आहे की त्याचा राजकीय संदेश लष्करी उद्दिष्टांपेक्षा जास्त आहे. या सरावामागे एक व्यावहारिक कारण देखील आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दक्षिण आफ्रिकेचे नौदल सध्या कमकुवत स्थितीत आहे आणि दीर्घकालीन सागरी ऑपरेशन्ससाठी त्यांची क्षमता मर्यादित आहे. सध्या, दक्षिण आफ्रिकेचे नौदल स्वतःहून इतके मोठे आणि दीर्घकालीन युद्धाभ्यास सराव करू शकत नाही. म्हणूनच, परदेशी नौदलांसोबतच्या सरावांमुळे त्यांना शिकण्याची आणि क्षमता वाढवण्याची संधी मिळते आहे.
आंतरराष्ट्रीय पटलावर याचा अर्थ काय?
संरक्षण जाणकारांच्या मते, या सरावात विविध देशांच्या युद्धनौकांमधील कवायती, सामूहिक ऑपरेशन्स आणि समन्वय यावर भर दिला जातो. यामध्ये PASSEX (पासिंग एक्सरसाइज) समाविष्ट आहे, ज्यामध्ये जहाजे फॉर्मेशन हालचाल आणि परस्पर समन्वयाचा सराव करतात. तज्ज्ञ डीन विंग्रिन यांच्या मते, अशा सराव नौदलासाठी आवश्यक आहेत, कारण कोणत्याही देशाला खोल समुद्रात एकटा संघर्ष करणे कमकुवत ठरू शकते. संकटाच्या काळात समन्वय महत्त्वाचा असतो.
अमेरिकेला काय संदेश आहे?
रशिया आधीच अमेरिका, युरोप आणि नाटोशी संघर्ष करत आहे. इराण पाश्चात्य निर्बंधांना तोंड देत आहे. सध्या इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत आणि अमेरिकेने हस्तक्षेप करण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान, चीन अमेरिकेशी धोरणात्मक स्पर्धा करण्यासाठी ही नवी युद्धनिती वापरत असल्याचे बोलले जात आहे.