थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 06:20 IST2025-07-27T06:17:42+5:302025-07-27T06:20:58+5:30

राजदूत बोलावले परत; युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा कंबोडिया-थायलंड सीमाभागातील आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

33 died and thousands displaced in thailand cambodia clash | थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

सुरिन : थायलंड व कंबोडियातील संघर्षाने उग्ररूप धारण केल्याने सीमा भागाचे युद्धभूमीत रूपांतर झाले आहे. तीन दिवसांपासून दोन्ही देशाच्या सैन्यात चकमकी झडत असल्याने काही जवानांसह ३३ जण ठार झाले असून शेकडो लोक जखमी झाले. या संघर्षामुळे सीमाभागातील हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. एक हजार वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिरावरून दोन्ही देशात युद्ध भडकल्याचा दावा करण्यात येत आहे. 

या संघर्षात कंबोडियातील १३ जणांचा मृत्यू झाला असून किमान ७१ नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये पाच जवानांचा तर ८ नागरिकांचा समावेश आहे. या संघर्षात थायलंडच्या २० लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ६ जवान व १४ नागरिकांचा समावेश आहे. थायलंडने मुद्दामहून हल्ले सुरू केले आहेत. थायलंडचे सैन्य त्यांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप कंबोडिया सरकारने केला आहे. युद्धामुळे सीमा भागातील चार प्रांत प्रभावीत झाल्याने अनेक गावांमधील किमान १ लाख  ६८ हजार लोक विस्थापित झाले आहेत. विस्थापित नागरिकांना तात्पुरत्या शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागल्याचा दावा थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. कंबोडियाने सीमा भागातील २३ हजार नागरिकांनी या संघर्षामुळे पलायन केले आहे. दोन्ही देशांनी आपल्या राजदूतांना परत बोलावले आहे. 

दोन्ही देशांनी केला दावा 

थायलंड व कंबोडियाच्या सीमेलगतच्या ता. मुएन थोम या पुरातन मंदिरावरून दोन्ही देशात वाद सुरू आहे. दोन्ही देशांकडून मंदिरावर दावा केला जातो. शुक्रवारी पहाटे सीमा भागात दोन्ही देशांच्या सैन्यात चकमकी उडाल्या.

संयुक्त राष्ट्राकडून शांततेचे आवाहन 

संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने थायलंड व कंबोडियाला शांततेचे आवाहन केले आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री न्यूयॉर्क येथे सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक झाली. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स या दहा देशांच्या प्रादेशिक गटाचे अध्यक्षपद मलेशियाकडे आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी शत्रुत्व संपवण्याचे आवाहन मलेशियाने केले आहे.  

भारतीयांना सतर्कतेचा इशारा 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कंबोडिया-थायलंड सीमाभागातील आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सीमा भागातील प्रवास टाळण्याचा सल्ला भारतीय दूतावासाने दिला. तसेच आपात्कालिन परिस्थितीत संपर्क करण्याचे आवाहनही दूतावासाने केले आहे.

 

Web Title: 33 died and thousands displaced in thailand cambodia clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.