एपस्टीन फाइल्सची ३० लाख नवी कागदपत्रे सार्वजनिक! डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव १००० वेळा; लेक इवांकाही गोत्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 19:16 IST2026-02-01T19:15:43+5:302026-02-01T19:16:53+5:30
अमेरिकन न्याय विभागाने एपस्टीनशी संबंधित तब्बल ३० लाख नवीन कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत.

एपस्टीन फाइल्सची ३० लाख नवी कागदपत्रे सार्वजनिक! डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव १००० वेळा; लेक इवांकाही गोत्यात?
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचा आरोप असलेल्या जेफरी एपस्टीनच्या प्रकरणाने संपूर्ण अमेरिकेत आणि जगात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकन न्याय विभागाने एपस्टीनशी संबंधित तब्बल ३० लाख नवीन कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. या कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव १,००० पेक्षा जास्त वेळा आले असून, त्यांची कन्या इवांका ट्रम्प हिच्या नावाचाही उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे 'एपस्टीन फाइल्स'चे रहस्य?
जेफरी एपस्टीन याने जगभरातील बड्या हस्तींना अल्पवयीन मुली पुरवण्याचे एक मोठे जाळे विणले होते. २०१९ मध्ये तुरुंगात संशयास्पद रितीने त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून या फाइल्स एफबीआयच्या ताब्यात होत्या. आता अमेरिकेच्या 'ट्रान्सपरन्सी ॲक्ट'नुसार या फाइल्स सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ लाख ८० हजार फोटो आणि २००० व्हिडिओ क्लिप्सचा समावेश असून, यात अनेक दिग्गज नेत्यांचे आणि अब्जाधीशांचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप?
या ताज्या कागदपत्रांमध्ये एका १३-१४ वर्षांच्या मुलीचा उल्लेख आहे, जिने कथितरित्या डोनाल्ड ट्रम्प यांना चावल्याचा आणि त्यानंतर तिला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला या फाइल्स सार्वजनिक करण्यास विरोध केला होता, मात्र आता त्यांनी दावा केला आहे की, "ही कागदपत्रे मला निर्दोष सिद्ध करतील." विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचे, इवांका ट्रम्प हिचे नाव एका ईमेलच्या संदर्भात समोर आले आहे.
एलन मस्क, बिल गेट्स आणि भारतीय धागेदोरे या काळ्या यादीत केवळ राजकारणीच नाहीत, तर उद्योगपतींचाही समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांचे नाव एपस्टीनच्या बेटावरील संभाव्य भेटींच्या संदर्भात आले आहे. बिल गेट्स यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून, रशियन मुलींशी संबंधित काही दावेही या फाइल्समध्ये आहेत.
भारतीय कनेक्शनही?
धक्कादायक म्हणजे, भारतीय वंशाच्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचेही नाव एका ईमेलमध्ये आले आहे. हा ईमेल २००९ मधील एका पार्टीशी संबंधित असल्याचे समजते. मीरा नायर या न्यूयॉर्कचे नवे महापौर झोहरान ममदानी यांच्या मातोश्री आहेत.
भविष्यात काय होणार?
या कागदपत्रांच्या खुलाशानंतर अमेरिकन राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. सेलिब्रिटी आणि पॉवरफुल लोकांच्या या अभद्र युतीचा चेहरा आता जगासमोर आला आहे. अनेक पीडित मुलींनी दिलेल्या साक्षी आणि पुराव्यांमुळे आता या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे स्पष्ट होत आहे.