पाकिस्तानने सुरक्षा भेदणाऱ्या २२ दहशतवाद्यांना उडवले; सुरक्षा जवानांनी राबवलं अभियान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:03 IST2025-11-26T12:55:06+5:302025-11-26T13:03:43+5:30
पाकिस्तानने मंगळवारी पूर्वेकडील तीन प्रांतात हवाई हल्ले केल्याचा दावा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने केला

पाकिस्तानने सुरक्षा भेदणाऱ्या २२ दहशतवाद्यांना उडवले; सुरक्षा जवानांनी राबवलं अभियान
पेशावर : पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलासोबत उडालेल्या चकमकीत तहरीक - ए - तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी गटाचे २२ सदस्य ठार झाले. पेशावर येथील निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर सोमवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तीन अधिकारी ठार झाले होते. त्यानंतर उत्तर वझीरिस्तान सीमेलगतच्या जिल्ह्यात सुरक्षा दलाने अभियान राबवले.
बन्नू जिल्ह्यातील एका दहशतवादी तळाविषयी गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने कारवाई सुरू केली. त्यावेळी उडालेल्या चकमकीत २२ खवारीज ठार झाले. पाकिस्तान सरकारकडून टीटीपीच्या दहशतवाद्यांचा उल्लेख ‘फितना अल खवारीज’ असा केला जातो.
पाकिस्तानच्या हल्ल्यांत ९ चिमुकल्यांसह १० ठार
पाकिस्तानने मंगळवारी पूर्वेकडील तीन प्रांतात हवाई हल्ले केल्याचा दावा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने केला. हवाई दलाने खोस्त प्रांतात एका घराला लक्ष्य करत हल्ला केल्याने ९ अल्पवयीन मुलांचा व एका महिलेचा मृत्यू झाला. कुनार व पक्तिका प्रांतात झालेल्या या हल्ल्यात इतर चार जण जखमी झाल्याचे प्रवक्त्याने सांगितले.