२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:13 IST2025-10-27T14:12:35+5:302025-10-27T14:13:50+5:30
एका २० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटन व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
ब्रिटनमध्ये भारतीय तरुणीसोबत संतापजनक कृत्य केल्याची घटना घडली आहे. उत्तर इंग्लंडमध्ये एका २० वर्षीय भारतीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. आरोपी श्वेतवर्णीय असून, पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो दिसून आला आहे. वर्णद्वेषातून तरुणीसोबत हे कृत्य करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
तरुणीवर आरोपीने भारतात परत जा म्हणत आधी हल्ला केला आणि त्यानंतर अत्याचार केले, अशी माहिती देण्यात आली आहे.
वेस्ट मिडलॅण्डस पोलिसांनी सांगितले की, तरुणी रस्त्यावर अडचणीत सापडली होती. तिला वॉल्सॉलमधील पार्क हॉलमध्ये बोलवले गेले. त्यानंतर तिच्यावर आधी हल्ला करण्यात आला आणि नंतर आरोपीने अत्याचार केले.
वेस्ट मिडलॅण्डस् पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून, तपासही सुरू आहे. तपास अधिकारी रोनन टायरर यांनी रविवारी सांगितले की, तरुणीवर झालेला हल्ला भयंकर आहे. आरोपीला अटक करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या अधिकाऱ्यांची पथके पुरावे गोळा करत आहेत.
आरोपीची माहिती गोळा केली जात आहे. लवकरात लवकर त्याला अटक केली जाईल. सध्या पोलीस वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्या परिसरात ही घटना घडली, त्यावेळी तिथे असलेल्या लोकांकडूनही पोलीस माहिती घेणार आहेत. त्यांना कुठली व्यक्ती शंकास्पद वावरताना दिसली होती का? याचीही माहिती गोळा केली जात आहे, असे टायरर यांनी सांगितले.