शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 05:25 IST2025-07-22T05:24:57+5:302025-07-22T05:25:29+5:30

हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून १६ विद्यार्थी, २ शिक्षक, पायलटचा मृत्यू; १७१ जण जखमी; इमारतीत शिकत होते पहिली ते सातवीचे विद्यार्थी

20 killed as plane crashes into school; Ahmedabad repeats in Bangladesh! | शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!

शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!

ढाका : बांगलादेशात हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान सोमवारी दुपारी उड्डाणानंतर काही वेळातच शाळेवर कोसळल्यामुळे २० ठार व १७१पेक्षा अधिक  जण जखमी झाले आहेत. चीननिर्मित एफ-७ बीजीआय हे विमान ढाकाच्या उत्तर भागात माईलस्टोन स्कूल अँड कॉलेज परिसरात कोसळले. अग्निशमन सेवा महासंचालक ब्रिगेडियर जनरल जाहेद कमाल यांनी सांगितले की, या दुर्घटनेत १९ जण ठार झाले. बचाव पथकाला शाळेच्या परिसरात १९ मृतदेह आढळले.

मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांचे आरोग्य मंत्रालयसंबंधी विशेष सहायक मो. सईदूर रहमान यांनी सांगितले की, ७२ जणांना भाजण्यामुळे व अन्य जखमांमुळे विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी आठजणांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात जखमींना आणण्याचा ओघ सुरूच आहे. विमानाचे वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट मो. तौकीर इस्लाम यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 

माझ्यापासून १० फुटांवर विमान कोसळले
अकरावीत शिकणारा विद्यार्थी फहीम हुसैन याने सांगितले की, माझ्या डोळ्यासमोर, केवळ १० फुटांवर विमान कोसळले. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे विमान कोसळले. ज्या ठिकाणी विमान कोसळले, तेथे प्राथमिक वर्ग सुरू होते.

पालकांचा आक्रोश
आठव्या इयत्तेत शिकणारे दोन चुलत भाऊ अपघाताच्या वेळी शाळेजवळ होते. दोघांचेही पालक आक्रोश करत माझी दोन्ही मुले देवाने हिरावून घेतली असे म्हणत होते.

एक दिवसाचा दुखवटा 
देशातील अंतरिम सरकारने मंगळवारी देशात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. या दिवशी बांगलादेश व त्याच्या विदेशातील दुतावासांमध्ये राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर राहील. मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी दुर्घटनेतील मृत व जखमींबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 

विमान कोसळताच मोठा आवाज अन् आग भडकली
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमानाने सोमवारी दुपारी १ वाजून ६ मिनिटांनी उड्डाण केले व काही वेळातच शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात कोसळले.
विमान चौथ्या मजल्यावर कोसळताच मोठा आवाज झाला व तत्काळ त्यात आग लागली. या प्रकारानंतर अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका व हवाईदलाचे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले.
एका शिक्षिकेने सांगितले की, सुरक्षाकर्मी मृतदेह बॅगमध्ये भरून ढाकामध्ये नेत आहेत. या इमारतीत पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिकतात. घटनास्थळाहून अनेक रुग्णवाहिका जखमींना नजीकच्या रुग्णालयात घेऊन जात होत्या.

भारत सर्वतोपरी मदत करणार
विमान दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे म्हटले आहे. या अपघाताने धक्का बसला. मृतांमध्ये अनेक विद्यार्थी आहेत, असे मोदी म्हणाले.

Web Title: 20 killed as plane crashes into school; Ahmedabad repeats in Bangladesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.