अमेरिकेत मनी लाँड्रिंग आणि इमिग्रेशन फसवणुकीत सहभागी असलेल्या दोन पाकिस्तानी देशद्रोह्यांना अटक करण्यात आली आहे. टेक्सासमध्ये राहणाऱ्या आरोपींबद्दल माहिती देताना एफबीआयचे संचालक काश पटेल म्हणाले की, अब्दुल हादी मुर्शिद आणि मोहम्मद सलमान नासिर नावाचे दोन लोक रिलायबल व्हेंचर्स नावाने एक कंपनी चालवत होते. ते व्हिसा फसवणूक, बेकायदेशीर इमिग्रेशन आणि मनी लाँड्रिंगमध्ये सामील होता.
मुर्शिदवर बेकायदेशीरपणे अमेरिकन नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. काश पटेल यांनी सोशल मीडियावर एफबीआय टीमचे कौतुक करणारी पोस्ट केली. जर दोघेही दोषी आढळले तर, दोघांनाही २० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती एफबीआयने दिली आहे.
सरकारचीही केली फसवणूक
दोघांवरही बनावट व्हिसा अर्जाद्वारे परदेशी लोकांना अमेरिकेत तस्करी करण्याचा आरोप आहे. ते बेकायदेशीरपणे अमेरिकेत येत असत आणि नंतर इथेच राहत असत. बऱ्याच वेळा, ते बनावट नोकरीची कागदपत्रे तयार करायचे. यानंतर, ते 'ईबी-२', 'एबी-३' आणि एच-१बी व्हिसा प्रणालीद्वारे फसवणूक करत असत.
दोन्ही आरोपी वृत्तपत्रांमध्ये बनावट नोकरीच्या जाहिराती देत असत. नोकरीत पहिलं प्राधान्य अमेरिकन लोकांना देण्याच्या नावाखाली अमेरिकन सरकारकडून मान्यता मिळवत असत, आणि व्हिसा शोधणाऱ्यांच्या नावाने ग्रीन कार्डसाठी अर्ज करत असत. यासाठी ते त्या लोकांकडून पैसे घेत असत आणि त्यातीलच काही भाग ते पगाराच्या नावाखाली परत करत असत.
काय शिक्षा होणार?
एफबीआयने म्हटले की, आरोपी बराच काळ इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन करत होते. त्यांची एक आंतरराष्ट्रीय टोळी होती. मुर्शिद आणि नासिर यांना २३ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील सुनावणीपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३० मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. मुर्शिद याला अमेरिकन नागरिकत्व मिळाले आहे. जर तो दोषी आढळला तर त्याचे नागरिकत्व जाईल आणि त्याला २० वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.