176 children lost parental umbrella in Sri Lankan blasts | श्रीलंकेतील स्फोटांमध्ये १७६ मुलांनी गमावले पालकांचे छत्र
श्रीलंकेतील स्फोटांमध्ये १७६ मुलांनी गमावले पालकांचे छत्र

कोलंबो - यंदा ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत १७६ मुलांनी त्यांचे माता-पिता किंवा त्यापैकी एकाचे छत्र गमावले. ही माहिती श्रीलंकेच्या कॅथॉलिक चर्चचे प्रमुख कार्डिनल माल्कम रणजित यांनी दिली आहे.

श्रीलंकेत २१ एप्रिल रोजी सहा सुसाईड बॉम्बरनी तीन चर्च व एका हॉटेलमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत २५८ जणांचा बळी गेला. त्यात काही भारतीय तसेच अन्य देशांतील नागरिकांचाही समावेश आहे. या दुर्घटनेत ५०० जण जखमी झाले होते.

कार्डिनल माल्कम रणजित हे गेल्या आठवड्यात रोमच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी एका वृत्तपत्राला मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये पालक गमावलेल्या मुलांची नीट काळजी घेण्यासाठी आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. तसेच जे मरण पावले त्यांचे वारसदार व जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)

पोप फ्रान्सिस यांना दिली सविस्तर माहिती

कोलंबोतील सेंट अ‍ॅन्थनी चर्च, नेगोम्बो शहरातील सेंट सॅबेस्टियन्स चर्च, बट्ट्रिकलोआ या भागातील एक चर्च येथे ईस्टर संडेच्या दिवशी प्रार्थना सुरू असताना आत्मघाती बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते.
कार्डिनल माल्कम रणजित म्हणाले की, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांबद्दलची सविस्तर माहिती पोप फ्रान्सिस यांना मी दिली आहे. या बॉम्बस्फोटात झालेल्या नुकसानीचे चित्रण असलेल्या डीव्हीडी पोपना देण्यात आल्या आहेत.


Web Title: 176 children lost parental umbrella in Sri Lankan blasts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.