बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:00 IST2025-07-03T15:58:02+5:302025-07-03T16:00:38+5:30
Hindu Girl Kidnapping in Pakistan: घटना उघ़डकीस आल्यानंतर परिसरात उडाली खळबळ

बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
Hindu Girl Kidnapping in Pakistan: पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका १५ वर्षीय हिंदू मुलीचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. नंतर तिचे लग्न लावले गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मानवाधिकार आयोगाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. सिंध प्रांत हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचा बालेकिल्ला मानला जातो.
डॉन वृत्तपत्रानुसार, सिंध प्रांतातील मातली गावात ४५ वर्षीय व्यक्तीने मानवाधिकार आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीनुसार, ४ तरुणांनी प्रथम त्याच्या घरात घुसून नंतर त्याच्या १५ वर्षीय भाचीला पळवून नेले. काही वेळाने त्याच्या भाचीचे लग्न लावले गेल्याची बातमी समोर आली. या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची विनंती त्या व्यक्तीने केली आहे.
मानवाधिकार आयोग सक्रिय, परिसरात दहशत
बंदुकीच्या धाकावर मुलीचे ज्या पद्धतीने अपहरण करण्यात आले, त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी व्यक्तीची ओळख पटली आहे. दोन आरोपींची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. त्यांची नावे मन्सूर डार आणि मकसूद डार अशी आहेत. मात्र, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
मानवाधिकार आयोगाने पाकिस्तान दंड संहितेच्या कलम ३६५-ब, ३६४-अ आणि ५०६ अंतर्गत या प्रकरणात कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच, आयोगाने मुलीची तात्काळ सुटका करण्याचेही आदेश दिले आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीशी लग्न करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अलिकडेच पाकिस्तान सरकारने याबाबत कठोर कायदा लागू केला आहे. उल्लंघन करणाऱ्या आरोपींना ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.