१४ कोटी बॅरल तेल उपलब्ध होणार; इराणच्या तेलावरील निर्बंध तात्पुरते शिथिल, तेलदरात मोठी उसळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 05:44 IST2026-03-22T05:43:50+5:302026-03-22T05:44:51+5:30
ही सवलत केवळ आधीच जहाजांमध्ये लोड असलेल्या तेलापुरती मर्यादित असून नव्या उत्पादन किंवा खरेदीला परवानगी देण्यात आलेली नाही.

१४ कोटी बॅरल तेल उपलब्ध होणार; इराणच्या तेलावरील निर्बंध तात्पुरते शिथिल, तेलदरात मोठी उसळी
दुबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेने आखातात अडकलेल्या इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध एका महिन्यासाठी (१९ एप्रिलपर्यंत) शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे सुमारे १४ कोटी बॅरल तेलबाजारात उपलब्ध होणार असून, ऊर्जापुरवठ्यात तात्पुरती वाढ होण्याची अपेक्षा आहे. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ सुरू ठेवत घेतला असल्याचे स्पष्ट केले. मात्र, ही सवलत केवळ आधीच जहाजांमध्ये लोड असलेल्या तेलापुरती मर्यादित असून नव्या उत्पादन किंवा खरेदीला परवानगी देण्यात आलेली नाही.
१४ कोटी बॅरल तेल बाजारात
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, या निर्णयामुळे इराणचे सुमारे १४ कोटी बॅरल तेल जागतिक बाजारात येईल. हे तेल आधीपासूनच टँकरमध्ये लोड असून विविध समुद्री मार्गांवर अडकलेले आहे. या पुरवठ्यामुळे ऊर्जाबाजारातील ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तेलदरात मोठी उसळी
युद्धामुळे जागतिक तेलबाजार अस्थिर झाला आहे. युद्धापूर्वी ब्रेंट क्रूड दर सुमारे ७० डॉलर प्रतिबॅरल इतका होता. सध्याचा दर जवळपास ११९.५० डॉलर प्रतिबॅरल इतका झाला आहे. या वाढीचा थेट परिणाम इंधनदरांवर झाला असून अमेरिकेत पेट्रोलचे दर ३ डॉलरवरून जवळपास ३.९९ डॉलर प्रतिगॅलनपर्यंत पोहोचले आहेत. भारतातही गॅसटंचाई झाली आहे.