"रोज रशियाचे 1000 सैनिक मारले जात आहेत, हा निव्वळ 'वेडेपणा', अमेरिका..."; झेलेंस्की यांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:58 IST2026-01-12T11:57:25+5:302026-01-12T11:58:09+5:30
त्यांनी, अमेरिका, युरोप आणि इतर देशांना एकत्र येऊन रशियाला रोखण्याचे आवाहनही केले. गेल्या चार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे.

"रोज रशियाचे 1000 सैनिक मारले जात आहेत, हा निव्वळ 'वेडेपणा', अमेरिका..."; झेलेंस्की यांचा धक्कादायक दावा
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात मोठा दावा केला आहे. या युद्धात डिसेंबर महिन्यापासून रशियाचे रोज किमान १,००० सैनिक मारले जात आहेत. युद्ध संपू नये म्हणून रशिया असे वागत आहे. हा निव्वळ 'वेडेपणा' आहे," असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी, अमेरिका, युरोप आणि इतर देशांना एकत्र येऊन रशियाला रोखण्याचे आवाहनही केले. गेल्या चार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे.
"जग अजूनही आक्रमक शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ" -
झेलेन्स्की पुढे म्हणाले, "जग अजूनही आक्रमक शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ असल्याचे या युद्धाने दाखवून दिले आहे. अमेरिका, युरोप आणि सर्व भागीदार देशांनी रशियाला रोखण्यासाठी संयुक्त कारवाई करायला हवी.
यावेळी झेलेन्स्की यांनी युक्रेनला सहकार्य अथवा मदत करणाऱ्या देशांचे आभारही मानले. ते म्हणाले, "युक्रेनसोबत उभे राहणाऱ्या सर्व देशांचे आभार. आमच्या जनतेला, आमच्या सुरक्षेला आणि आमच्या पुनर्निर्माणासाठी मदत करणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो."
रशियाचा मोठा हवाई हल्ला -
तत्पूर्वी, शुक्रवारी झेलेन्स्की यांनी सांगितले होते की, रशियाने रात्रभर युक्रेनवर मोठे हवाई हल्ले केले. रशियाने २४२ ड्रोन, १३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २२ क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांत किमान चार जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.
कीवमध्ये मोठे नुकसान -
झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी कीव आणि जवळपासच्या प्रदेशातील हल्ले अधिक मोठे होते. एकट्या कीवमध्ये चार जणांचा मृत्यू झाला, यात एका रुग्णवाहिका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. याशिवाय, सुमारे २० निवासी इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. यानंतर, मदत आणि बचाव कर्मचारी पीडितांना मदत करत असताना, रशियाने पुन्हा त्याच निवासी इमारतीवर हल्ला केला. अद्यापही अनेक भागात दुरुस्ती आणि मदतकार्य सुरू आहे.