मेहनतीचं फळ... ज्या कंपनीत केलं सिक्युरिटी गार्डचं काम, आज त्याच कंपनीत आहे 'Tech Officer'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:03 IST2021-04-06T14:56:05+5:302021-04-06T15:03:39+5:30
पाहा कसा होता त्याचा हा प्रवास

मेहनतीचं फळ... ज्या कंपनीत केलं सिक्युरिटी गार्डचं काम, आज त्याच कंपनीत आहे 'Tech Officer'
म्हणतात ना शिकण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नसते. तुम्ही जे काही शिकता ते तुमच्याकडून कोणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. जरीही तुम्हाला आयुष्यात शिकताना कोणत्याही संधी मिळाल्या नसतील. परंतु जर तुम्ही मनाशी इच्छा बाळगली तर तुम्हाला कोणीही पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. अब्दुल आलीम हे नाव असंच एक सर्वांसाठी मोठं उदाहरण आहे. तो सध्या Zoho या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो. परंतु यापूर्वी तो याच कंपनीत एक सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत होता. त्याचा हा प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
२०१३ मध्ये अब्दुलनं जेव्हा आपलं घर सोडलं तेव्हा त्याच्याकडे केवळ १००० रूपये होतं. त्यानं १० वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. अथक प्रयत्नांनंतर अब्दुलला सिक्युरिटी डेस्कवर नोकरी मिळाली. परंतु एकदा एका वरिष्ठानं त्याला एक प्रश्न विचारला आणि त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. मी तुझ्या डोळ्यात काही पाहू शकतो असं म्हणत एका सीनिअरनं त्याला कंम्प्युटरच्या ज्ञानाबद्दल विचारसं. त्यावेळी त्यानं आपण शाळेमध्ये बेसिक HTML चं शिक्षण घेतल्याचं सांगितलं.
आलीममध्ये नव्या गोष्टी शिकण्याची इच्छा होती. त्यामुळे सीनिअर कर्मचाऱ्यांनीही त्याला शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंर आलीम आपलं काम पूर्ण करून त्याच कंपनीत कोडींग शिकू लागला. सलग आठ महिने शिकल्यानंतर आलीमनं एक अॅप विकसित केलं. त्यानंतर कंपनीतील सीनिअर्सनं खूश होत इंटरव्ह्यू मॅनेजरसोबत त्याची मुलाखत निश्चित केली. आलीमनं मुलाखत यशस्वीरित्या पार पाडली. आता त्याला zoho या कंपनीत आठ वर्ष पूर्ण होत आली आहेत.
LinkedIn वर शेअर केली स्टोरी
काही दिवसांपूर्वी आलीमनं आपला हा प्रवास LinkedIn वर शेअर केला होता. त्यानंतर हजारो युझर्सनं त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. आतापर्यंत त्याच्या या पोस्टला हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी त्याच्या या जिद्दीला सलाम ठोकला आहे.