दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी! पोस्टमनची लेक झाली ‘सीए’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:41 IST2026-01-07T08:41:33+5:302026-01-07T08:41:33+5:30
अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण करून कृतीतून सिद्ध केले आहे.

दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी! पोस्टमनची लेक झाली ‘सीए’
कांता हाबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नेरळ : ‘दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी’ ही म्हण नेरळ गावातील पोस्टमनच्या लेकीने सिद्ध करून दाखवली आहे. मुलीला तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांच्या हातात लेकीने जिद्दीने मिळवलेली सीएची पदवी ठेवताच बापाची छाती अभिमानाने फुलून आली आहे. भारतीय टपाल खात्यात पोस्टमन म्हणून सेवा बजावणारे बाळकृष्ण दाभणे व त्यांची कन्या सायली सुनीता हिने हे अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण करून कृतीतून सिद्ध केले आहे.
पोस्टमनची लेक झाली ‘सीए’
उठता-बसता येईल, असं साधसं घर, दिवसरात्र राबल्यानंतरही मिळणारे मर्यादित उत्पन्न आणि रोजच्या गरजांसाठी द्यावी लागणारी झुंज अशा खडतर परिस्थितीतून सायलीचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला.
वडील पोस्टमन म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना आई सुनीता दाभणे यांनी संसार सांभाळत मुलीच्या स्वप्नांना बळ देत तिच्या शिक्षणाला पाठिंबा दिला.
मुलीचं शिक्षण हेच आमचं भांडवल, या विचारावर ठाम राहत दोघांनीही अडचणी कधीच पुढे येऊ दिल्या नाहीत. प्रसंगी पोटाला चिमटा काढला, पण मुलीच्या शिक्षणात खंड पडून दिला नाही.
प्रेरणादायी यश
भारतीय टपाल खात्यात पोस्टमन म्हणून सेवा बजावणारे बाळकृष्ण दाभणे यांनी आयुष्यभर सायकलवरून प्रवास करून इमानेइतबारे नोकरी आली. मुलीच्या शिक्षणासाठीची त्यांची धडपड सर्व गावाने पाहिली असून त्यांच्या लेकीनेही याचा जाण ठेवत मिळवलेले हे यश इतरांसाठी नक्कीच प्ररेणादायी आणि मार्गदर्शक आहे.
शिस्त, नियोजन, आत्मविश्वासाची त्रिसूत्री
मुलीनेही याची जाण ठेवत सीए परीक्षेच्या तयारीदरम्यान उभी राहिलेले अनेक संकटे, अपयशाचे क्षण, आर्थिक मर्यादा, मानसिक ताण याच्या धीराने लढा दिला. प्रत्येक अपयशाला शिकवण मानून झोप, आराम, सण-समारंभ बाजूला ठेवून तिने स्वत:ला अभ्यासात झोकून दिले.
कमी साधनांतूनही शिस्त, नियोजन आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर तिने परीक्षा उत्तीर्ण करून यशाला गवसणी घातली आहे. सायली दाभणे हिचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे नेरळ विद्यामंदिर नेरळ या शाळेत झाले, तर अकरावी, बारावी तसेच बीएपर्यंचे शिक्षण हे सीएचएम कॉलेज उल्हासनगर येथे झाले.
सीए होण्यासाठी तिचे खूप प्रयत्न सुरू होते, तरंतू कोविडच्या काळात ती परीक्षा देवू शकली नाही. त्यामुळे तिचे हे स्वप्न अर्पूण राहिले होते. ते तिने दुसऱ्याच प्रयत्नात पूर्ण केले आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला असून ती सध्या सीएच प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेत आहे.
आई-वडिलांचा विश्वास हेच माझं खरं भांडवल होतं. परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही, आपणच थांबायचं ठरवलं तरच अपयश येत, हा मूलमंत्र गाठीशी बांधत जिद्दीने अभ्यास करून परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळाले. सायली सविता बाळकृष्ण दाभणे
आज नेरळमधील सामान्य पोस्टमनची मुलगी ‘सीए’ झाली असून केवळ एका कुटुंबाची यशोगाथा नाही, तर ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. त्यामुळे मोठी स्वप्ने ठेवा, प्रामाणिकपणे मेहनत करा, यश तुमच्याच दारात येऊन उभं राहील. - बाळकृष्ण दाभणे