महिला विश्वचषक : भारताचे आव्हान संपुष्टात, पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 06:16 IST2018-08-03T04:58:31+5:302018-08-03T06:16:35+5:30
महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ असे संपुष्टात आले. आयर्लंडने भारतावर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे.

महिला विश्वचषक : भारताचे आव्हान संपुष्टात, पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून पराभूत
लंडन : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ असे संपुष्टात आले. आयर्लंडने भारतावर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे.
महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यात महिला भारतीय संघाला अपयश आले आहे. महिला संघाने क्रॉस ओव्हर सामन्यात इटलीवर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र, आयर्लंडचा अडथळा पार करता आला नाही. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी सामना बरोबरीत सोडवल्याने लढतीचा निर्णय पेनल्टी शूटआऊटवर झाला. सामन्याच्या १८व्या मिनिटाला आयर्लंडकडे गोल करण्याची संधी होती. मात्र, त्यांनी ती दवडली. त्यानंतर २५ व्या मिनिटाला भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडच्या संघाने भारताच्या गोलवर हल्ले केले. मात्र, बचाव फळी आणि गोलकीपर सविता यांनी यश मिळू दिले नाही. चौथा क्वार्टरही गोलरहित झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडला पहिल्या २ वेळा गोल करता आला नाही. मात्र, त्यानंतर त्यांनी सलग तीन गोल करत सामना जिंकला. भारताकडून राणी, नवज्योत आणि मोनिका यांनी पहिल्या ३ संधी दवडल्या. रिना खोखर हिला एकमेव गोल करता आला.