"भारतापर्यंत बातमी पोहोचली म्हणून..."; पाकिस्तानने हॉकी कॅप्टनला भांडी घासतानाचा व्हिडीओ डिलीट करायला लावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:31 IST2026-02-20T12:31:19+5:302026-02-20T12:31:38+5:30
Pakistan Hockey Controversy: पाकिस्तान हॉकी टीमचा कर्णधार अम्मद शकील बटचा खळबळजनक खुलासा. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंना भांडी घासावी लागली. भारतामुळे व्हिडिओ डिलीट केल्याचा दावा. सविस्तर बातमी वाचा.

"भारतापर्यंत बातमी पोहोचली म्हणून..."; पाकिस्तानने हॉकी कॅप्टनला भांडी घासतानाचा व्हिडीओ डिलीट करायला लावला
लाहोर: पाकिस्तानी क्रीडा विश्वात सध्या एका व्हिडिओने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तानहॉकी टीमचा कर्णधार अम्मद शकील बट याने आपल्याच बोर्डाचे वाभाडे काढले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंवर हॉटेलमध्ये चक्क भांडी घासण्याची वेळ आली होती, असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. यावरून पाकिस्तानात मोठा गदारोळ उडाला असून हॉकीच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला असून यावर आवाज उठविल्याने बटवर देखील बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या (PHF) गैरव्यवस्थापनामुळे खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सिडनी विमानतळावर खेळाडूंना १३-१४ तास वाट पाहावी लागली आणि हॉटेलचे पेमेंट न केल्यामुळे त्यांना रस्त्यावर उभे राहावे लागले. अम्मद शकीलने सांगितले की, "आम्हाला सामन्यापूर्वी स्वतःची भांडी घासावी लागली आणि किचन साफ करावे लागले. अशा परिस्थितीत तुम्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा कशी करू शकता?"
व्हिडिओ का डिलीट केला?
या त्रासाचे व्हिडिओ अम्मदने समाजमाध्यमांवर शेअर केले होते, पण नंतर ते अचानक डिलीट करण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला, "मॅनेजमेंटने माझ्यावर दबाव टाकला होता. ते म्हणाले की ही बातमी भारतापर्यंत पोहोचली आहे आणि यामुळे पाकिस्तानची बदनामी होत आहे. जेव्हा भारताचे नाव आले, तेव्हा मला वाटले की माझ्या देशाची प्रतिमा मलीन होऊ नये, म्हणून मी 'सर्व काही ठीक आहे' असा खोटा व्हिडिओ बनवला. पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत वाईट होती."
पंतप्रधानांकडून चौकशीचे आदेश
हे प्रकरण तापल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. खेळाडूंच्या राहण्यासाठी १० दशलक्ष रुपये देऊनही त्यांची अशी अवस्था का झाली, याचा जाब आता विचारला जात आहे. अशातच कप्तान बटवर पाकिस्तान हॉकीने दोन वर्षांचा प्रतिबंध घातला आहे. अध्यक्ष बुगती यांनी या सर्व गैरकारभाराचा ठपका पाकिस्तानी क्रीडा बोर्डावर ठेवला आहे, तर बोर्डाने आम्ही पैसे आधीच दिले होते, असे स्पष्ट केले आहे.