हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताची वेल्सवर मात, पण उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी पार करावा लागेल मोठा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 23:47 IST2023-01-19T23:47:21+5:302023-01-19T23:47:42+5:30
FIH Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताने गुरुवारी जबरदस्त कामगिरी करत वेल्सवर मात केली. मात्र आवश्यक गोलफरक राखता न आल्याने भारताला थेट उपांत्यफेरी गाठता आली नाही.

हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताची वेल्सवर मात, पण उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी पार करावा लागेल मोठा अडथळा
हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताने गुरुवारी जबरदस्त कामगिरी करत वेल्सवर मात केली. मात्र आवश्यक गोलफरक राखता न आल्याने भारताला थेट उपांत्यफेरी गाठता आली नाही. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडवर मात करावी लागेल. आज झालेल्या सामन्यात भारतीय संघाकडून आकाशदीप सिंहने २ गोल केले. तर शमशेर सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला.
आज वेल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ४-२ ने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने डी गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याबरोबरच यजमान संघाने क्रॉस ओव्हर सामन्यासाठी क्वालिफाय केले आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल.
भारताने शमसेर सिंह (२१ वे मिनिट) आणि आकाशदीप सिंह (३२ वे मिनिट) यांनी यांनी केलेल्या जोरावर २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र नंतर वेल्सने दोन मिनिटांमध्ये दोन गोल मारून भारताला धक्का दिला. वेल्सने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने केले. वेल्सकडून गॅरेथ फर्लोंग (४२ वे मिनिट) आणि जेकब ड्रेपर (४४ वे मिनिट) यांनी गोल करत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर आकाशदीप सिंहने ४५ व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडीवर नेते. त्यानंतर हरमनप्रीत सिंह याने ५९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला ४-२ ने विजय मिळवून दिला.
भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ सामन्यांमध्ये ७ गुण मिळवले आहेत. मात्र सरस गोलफरकाच्या जोरावर इंग्लंडने ड गटात अव्वलस्थान पटकावत थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने ड गटामध्ये स्पेनला ४-० ने पराभूत केले. आता इंग्लंडचा संघ थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर भारत आणि स्पेनचे संघ उपांत्य फेरीच्या इतर चार स्थानांसाठी क्रॉस ओव्हर सामने खेळणार आहेत.