Commonwealth Games 2018 : हॉकीत भारतीय महिलांचा इंग्लंडला दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 09:44 IST2018-04-08T08:46:58+5:302018-04-08T09:44:12+5:30
भारतील महिला हॉकी संघाने बलाढ्य इंग्लंडवर 2-1 ने मात करत राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी सकाळी एका सनसनाटी विजयाची नोंद केली.

Commonwealth Games 2018 : हॉकीत भारतीय महिलांचा इंग्लंडला दणका
मुंबई - भारतील महिला हॉकी संघाने बलाढ्य इंग्लंडवर 2-1 ने मात करत राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी सकाळी एका सनसनाटी विजयाची नोंद केली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत नवनीत कौर आणि गुरजित कौर यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर भारतीय महिलांनी इंग्लंडचे आव्हान परतवून लावले. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघांने तब्बल 16 वर्षांनंतर इंग्लंडवर मात करण्यात यश मिळवले आहे.
पहिल्या लढतीत वेल्सकडून अनपेक्षितरित्या पराभूत झालेल्या भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱ्या लढतीत मलेशियावर मात केली होती. दरम्यान, आज झालेल्या महत्त्वपूर्ण लढतीत भारतीय संघ पहिल्याच मिनिटाला पिछाडीवर पडला होता. अलेक्झँड्रा डेन्सन हिने पहिल्याच मिनिटाला गोल करून इंग्लंडला आघाडीवर नेले मात्र 41व्या मिनिटाला नवनीत कौर आणि 47 व्या मिनिटाला गुरजित कौर यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला.
त्याआधी अखेरच्या पाच मिनिटात दोन गोल नोंदविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने अ गटात शुक्रवारी मलेशियाचा ४-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी पथावर पुनरागमन केले होते.
गुरजित कौरने ६ व्या तसेच ३९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविले. कर्णधार राणी रामपालने ५६ व्या तसेच लालरेमसियामीने ५९ व्या मिनिटाला एकेक गोल केला. याआधी काल वेल्सकडून भारतीय संघ ३-२ ने पराभूत झाला होता. मलेशियाकडून एकमेव गोल नुरेनी राशीद हिने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला.